'स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान तरुण पिढीत रुजवावे'; ‘अनसुया माय वाईफ’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2023 10:25 PM2023-02-23T22:25:05+5:302023-02-23T22:25:35+5:30

Nagpur News स्वातंत्र्य पराक्रमाने मिळविलेले आहे. यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. ही भावना येणाऱ्या पिढीमध्ये रुजविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी लोकसभा अध्यक्ष व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी केले.

'The contribution of freedom fighters should be inculcated in the younger generation'; Publication of the book 'Ansuya My Wife' | 'स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान तरुण पिढीत रुजवावे'; ‘अनसुया माय वाईफ’ पुस्तकाचे प्रकाशन

'स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान तरुण पिढीत रुजवावे'; ‘अनसुया माय वाईफ’ पुस्तकाचे प्रकाशन

googlenewsNext

नागपूर : ‘दे दी हमे आजादी बिना खडग् बिना ढाल....’ असे म्हणत आपण आपली तरुण पिढी मवाळ केली. देशाला स्वातंत्र्य केवळ अहिंसेनेच मिळालेले नाही. हे स्वातंत्र्य पराक्रमाने मिळविलेले आहे. यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. ही भावना येणाऱ्या पिढीमध्ये रुजविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी लोकसभा अध्यक्ष व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी केले.

ज्येष्ठ उद्योजक दिवंगत पुरुषोत्तम काळे यांनी त्यांच्या पत्नी दिवंगत अनसुया काळे १९६२ साली प्रकाशित केलेल्या आठवणींचा संग्रह असलेल्या मराठी पुस्तकाचा दीपाली काळे यांनी इंग्रजीत ‘अनसुया माय वाईफ- द फायर ब्रॅण्ड फ्रीडम फायटर’ या शीर्षकांतर्गत अनुवाद केला असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी पार पडला. बनयान सभागृह, चिटणवीस सेंटर येथील कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सच्या माजी अध्यक्षा शीला काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, तर व्यासपीठावर विलास काळे, कुमार काळे, जयदेव काळे, प्रवीण काळे प्रामुख्याने उपस्थित होते.

माजी खासदार दिवंगत अनसुया काळे यांनी राजकारणात वावरताना व्यक्तिमत्त्व कसे असावे, अभ्यासपूर्ण कसे बोलावे, वंचित समाजासाठी विशेषत: महिलांसाठी कसे कार्य करावे याचा वस्तुपाठ घालून दिला होता. त्यांचे हे कार्य राजकारणातील सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.

शीला काकडे यांनी ऑल इंडिया वूमेन कॉन्फरन्सच्या कार्याची माहिती देताना त्यातील अनसुया काळे यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला.

नरेश सबजीवाले यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली. विलास काळे यांनी अनसुया काळे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन प्रणोती गद्रे यांनी केले. पूर्वा काळे यांनी आभार मानले.

 स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलणे हे नागपूरचे वैशिष्ट्य

नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलतात. अनुसया काळे यासुद्धा स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलत होत्या. तेव्हा स्पष्ट व अभ्यासपूर्ण बोलणे हे नागपूरचे वैशिष्ट्य असल्याचे दिसून येते, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.

Web Title: 'The contribution of freedom fighters should be inculcated in the younger generation'; Publication of the book 'Ansuya My Wife'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.