नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : कोंढाळीच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या नागपूरच्या व्यापाऱ्याची कार जळून कोळसा झाली. आज पहाटे २ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
ईजहार अंजूम परवेझ अंसारी (वय २७) असे कार मालकाचे नाव आहे. ते व्यापारी असून वाठोड्यात प्लास्टीकचे रिसायकलिंग करतात. त्यांच्या मालकीच्या एमएच ४९/बीडब्ल्यू ९५९६ क्रमांकाच्या मारूती कारने ते शनिवारी रात्री अमरावती मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यांनी कार पार्किंगमध्ये लावली अन् ते हॉटेलमध्ये गेले असता कारच्या बोनटमधून अचानक आगीचा भडका उडाला. कुणाला काही कळायच्या आतच कारचे बोनट, इंजिन, रेडियेटर आणि संपूर्ण वायरिंग आगीमुळे कोळसा झाली. या घटनेमुळे हॉटेल परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. शक्य होईल त्या साधनाने काहींनी धाव घेत कारची आग विझवली.
कारमालक ईजहार अंजूम यांनी कोंढाळी पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवली. त्यानुसार, त्यांची ही कार आपोआप जळाली आणि त्यात त्यांचे १३ लाखांचे नुकसान झाले. या कारचा विमा असल्याने त्यांचे मोठे नुकसान टळले अन्यथा त्यांना मोठा आर्थिक फटका बसला असता.
मोठा अनर्थ टळलाया कारच्या आजुबाजूला अनेक कार उभ्या होत्या. सुदैवाने या किंवा त्या कोणत्याच कारमध्ये कुणी बसून नसल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचप्रमाणे लवकर आग विझविण्यात आल्याने अन्य कारचेही नुकसान टळले.