नागपुरातील व्यापाऱ्यांचे निर्बंधांविरोधात ‘थाली बजाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:07 IST2021-04-09T04:07:56+5:302021-04-09T04:07:56+5:30

नागपूर : राज्यातील व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता ३० एप्रिलपर्यंत राज्य शासनाने लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत ...

'Thali Bajaw' against restrictions of traders in Nagpur | नागपुरातील व्यापाऱ्यांचे निर्बंधांविरोधात ‘थाली बजाव’

नागपुरातील व्यापाऱ्यांचे निर्बंधांविरोधात ‘थाली बजाव’

नागपूर : राज्यातील व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता ३० एप्रिलपर्यंत राज्य शासनाने लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. दुकाने सुरू करून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, तर अर्थव्यवस्थेला हातभारच लागणार आहे. राज्य शासनाने दुकाने सुरू करण्याचा आदेश देण्याच्या मागणीसाठी नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी गुरुवारी ‘थाली बजाव-सरकार जगाव’ असे आगळेवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

हे आंदोलन सेंट्रल एव्हेन्यू मार्ग, गांजाखेत चौक, इतवारी सराफा बाजार चौक, इतवारी हार्डवेअर मार्केट, होलसेल क्लॉथ मार्केट नंगा पुतळा चौक, सीताबर्डी मेन रोड, धरमपेठ लक्ष्मीभुवन चौक या व्यापारी भागात करण्यात आले. यावेळी व्यापाऱ्यांनी आपापल्या बंद दुकानासमोर अर्धा तास थाळी वाजवून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.

ऑटोमोबाईल असोसिएशन नागपूर व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रिन्स तुली म्हणाले, लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. व्यापाऱ्यांवर वीज बिल, बँकांचे कर्ज व व्याज, सरकारचा कर, कर्मचाऱ्यांचे पगार, आदींचा नियमित खर्च सुरू आहे. तो कसा पूर्ण करायचा याचे आव्हान आहे. रस्त्यावर गाड्या धावत आहेत. त्या गाड्यांना लागणाऱ्या सुट्या भागांची दुकाने बंद असतील तर गाड्या जागीच उभ्या राहतील. ट्रॅक्टर असो वा अ‍ॅम्ब्युलन्स यांनाही सुट्या भागांची गरज आहे. लॉकडाऊनमुळे सर्व साखळी तुटणार आहे. नागपूर ऑटोमोबाईलचे हब असल्याचा परिणाम संपूर्ण विदर्भावर होणार आहे. आंदोलनात योगेश अग्रवाल, धर्मेश मेहता, इशान बत्रा, राजीव झवेरी, सुनील चव्हाण, अभिषेक दोशी, बिट्टू अरोरा, राजू वासवानी यांच्यासह शेकडो व्यापारी उपस्थित होते.

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, गेल्यावर्षीपासून कधी केंद्र सरकार, राज्य सरकार तर कधी स्थानिक प्रशासन लॉकडाऊनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांवर आर्थिक आघात करीत आहे. सरकार आर्थिक मदत करण्याऐवजी व्यापाऱ्यांवर मानसिक आणि आर्थिक दडपण टाकत आहे. सध्याचे लॉकडाऊन तब्बल २५ दिवसांचे आहे. दुकाने सुरू करण्याची सर्वच दुकानदारांची मागणी आहे; पण सरकार कुणाचेही ऐकत नाही. अशा स्थितीत सरकारला जाग यावी म्हणून गुरुवारी नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये थाली बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सर्व व्यापारी संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लॉकडाऊन लावताना सरकारने व्यापाऱ्यांवरील कर माफ करावे, शिवाय आर्थिक मदत द्यावी. राज्य शासनाने दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी.

याशिवाय सर्वच बाजारपेठांमध्ये सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शांततापूर्ण आंदोलने करण्यात आली. अशा प्रकारची आंदोलने रोज सुरू राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. गांधीबाग आणि इतवारी येथील बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी थाली बजाव आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधले.

Web Title: 'Thali Bajaw' against restrictions of traders in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.