औषधाविना थॅलेसिमीयाचे रुग्ण अडचणीत!

By Admin | Updated: November 5, 2014 00:51 IST2014-11-05T00:51:07+5:302014-11-05T00:51:07+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) थॅलेसिमीयाच्या रुग्णांना आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा पडला आहे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने

Thalassimea patient without a medication! | औषधाविना थॅलेसिमीयाचे रुग्ण अडचणीत!

औषधाविना थॅलेसिमीयाचे रुग्ण अडचणीत!

मेयो रुग्णालयात तुटवडा : दहा दिवसांपासून मेडिकलचाही पुरवठा बंद
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) थॅलेसिमीयाच्या रुग्णांना आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा पडला आहे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) फक्त औषधासाठी आलेल्या रुग्णांना औषध देणे बंद केले आहे. निधीचा अभाव असल्याने मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांनाच औषध देण्यात येईल, अशी भूमिका मेडिकल प्रशासनाने घेतल्याने थॅलेसिमीयाचे रुग्ण अडचणीत सापडले आहेत.
भारतात फक्त एक किंवा दोन ठिकाणीच ‘थॅलेसीमिया मेजर’ या रोगावर उपचार होतो. या उपचाराच्या प्रक्रियेस ‘अस्थिमज्जा प्रतिरोपण’ (बोन मॅरो ट्रान्सप्लॅन्टेशन) असे म्हणतात. या उपचाराच्या प्रक्रियेस अंदाजे १० लक्ष रुपयांचा खर्च येतो. अनेकांना हा खर्च झेपत नाही, यामुळे ‘ब्लड ट्रान्सफ्युसन’ तसेच लोहयुक्त गोळ्याचा उपचार घेतात. विशेष म्हणजे, गोळ्याचा खर्चही साधारण माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. देशात फक्त गुजरात आणि राजस्थानमध्ये या आजारावरील औषध नि:शुल्क दिले जाते. महाराष्ट्रातही ही सोय उपलब्ध व्हावी, यासाठी थॅलेसीमिया सोसायटी आॅफ सेंट्रल इंडियाच्यावतीने प्रयत्न झाले. त्यानुसार एप्रिल २०१२ पासून मेयो आणि मेडिकल रुग्णालयात ही औषधे मोफत मिळणे सुरू झाले. परंतु मेयोमध्ये या औषधांचा नेहमीच तुटवडा राहत असल्याने रुग्णांची मेडिकलमध्ये गर्दी वाढली.
या गोळ्यांचा खर्च झेपत नसल्याने आणि डेंग्यू व इतर आजाराच्या रुग्णांवर औषधांचा खर्च वाढल्याने मेडिकल प्रशासनाने दहा दिवसांपासून फक्त गोळ्या घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना औषध देणे बंद केले आहे. जे रुग्ण उपचार घेतात फक्त त्यांनाच औषध दिले जात आहे.
या संदर्भात थॅलेसीमिया सोसायटी आॅफ सेंट्रल इंडियाचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी यांनी आज मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयी माहिती दिली. त्यांनी लागलीच सचिव प्रवीण दराडे यांना यात लक्ष घालण्यास सांगितले. दराडे यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना दूरध्वनीवरून माहिती मागितली असता त्यांनी औषधांसाठी अपुऱ्या निधीची समस्या मांडली.(प्रतिनिधी)
थॅलेसिमीयासाठी स्वतंत्र निधीची गरज
मेडिकलमध्ये औषधांवर वर्षाला सहा कोटी रुपये खर्च होतो. यातील साधारण ३० टक्के खर्च हा फक्त थॅलेसिमियाच्या औषधांवर होत आहे. सद्यस्थितीत या आजाराच्या औषधांचे ६८ लाखांचे बिल प्रलंबित आहे. मेडिकलमध्ये इतरही आजारांचे रुग्ण असतात. त्यांनाही औषधे पुरवावी लागतात. विशेष म्हणजे, थॅलेसिमियाचे बहुसंख्य रुग्ण खासगी डॉक्टरांकडून उपचार घेऊन मेडिकलमध्ये फक्त औषधांसाठी येतात, परंतु जे रुग्ण मेडिकलमध्येच उपचार घेतात त्यांना औषध उपलब्ध करून दिले जात आहे. सिकलसेलच्या औषधांसाठी मेडिकलला जसा स्वतंत्र निधी मिळतो, तसा निधी थॅलेसिमियाच्या औषधांसाठी मिळाल्यास औषध पुरवठा करणे शक्य होईल.
- डॉ. अभिमन्यू निसवाडे
अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: Thalassimea patient without a medication!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.