परवाना नूतनीकरणाकडे आॅटोचालकांची पाठ

By Admin | Updated: December 2, 2015 03:26 IST2015-12-02T03:26:50+5:302015-12-02T03:26:50+5:30

१९७७ नंतरचे रद्द झालेले व २००६ च्या पूर्वीचे आॅटो परवाने व बॅचधारकांना नवीन परवाने देण्याचा निर्णय तब्बल सात वर्षानंतर शासनाने घेतला.

Text of autorickshaw drivers for license renewal | परवाना नूतनीकरणाकडे आॅटोचालकांची पाठ

परवाना नूतनीकरणाकडे आॅटोचालकांची पाठ

मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद : नागपुरात २२३८ तर ग्रामीणमध्ये १६३९ परवाने रद्द होणार!
नागपूर : १९७७ नंतरचे रद्द झालेले व २००६ च्या पूर्वीचे आॅटो परवाने व बॅचधारकांना नवीन परवाने देण्याचा निर्णय तब्बल सात वर्षानंतर शासनाने घेतला. परवाने घेणे सोयीचे जावे याकरिता वारंवार मुदत वाढीसह शुल्कात कपात व शिक्षणाची अटही रद्द केली. ३० नोव्हेंबर शेवटीची तारीख होती. परंतु शहर आणि ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) या नूतनीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. शहरात २२३८ तर ग्रामीणमध्ये १६३९ परवान्याला आॅटोचालकांनी पाठ दाखविली आहे.
राज्यात सद्य:स्थितीत ७ लाख २६ हजार आॅटोरिक्षा परवाने आहेत. यातील १ लाख ४० हजार ६५ आॅटोरिक्षांचे परवाने परिवहन विभागाने रद्द केले होते. त्यांच्या नूतनीकरणाचा आग्रह आॅटोरिक्षा चालक संघटनांनी धरला होता. अखेर परिवहन विभागाने आपले जुने आदेश मागे घेत परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे नवे आदेश काढले.
परवाना नूतनीकरणाची शेवटची मुदत ३१ आॅक्टोबर २०१५ देण्यात आली होती. नंतर ती वाढवून १६ नोव्हेंबर करण्यात आली होती. या दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षांवर जप्तीची मोहीमही सुरू केली, तरीही अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने तिसऱ्यांदा परिवहन विभागाने अंतिम मुदतीत वाढ करीत ती ३० नोव्हेंबर केली. या तारखेपर्यंत परवानाधारकांनी परवाना नूतनीकरण केले नाही तर त्यांचे परवाने कायमचे रद्द करण्याचे आदेशही काढले, परंतु तरीही देखील आॅटोचालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)

५० टक्केही प्रतिसाद नाही
शहर आरटीओ व पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मिळून ४२२४ आॅटो परवानांचे नूतनीकरणाला मंजुरी मिळाली होती. सुरुवातीला १४७० आॅटोचालकांनी नूतनीकरण केले, परंतु आताच्या मोहिमेत फक्त २७३ परवान्यांचे नूतनीकरण झाले. यात कार्यालयाला ४३ लाख ५० हजार ५७४ रुपयांचा महसूल मिळाला तर पूर्व आरटीओला २४२ परवानाचे नूतनीकरण होऊन २९ लाख ९ हजार ५१० रुपयांचा महसूल मिळाला. दोन्ही मिळून १९८६ परवान्यांना चालक मिळाले. उर्वरित २२३८ परवाने आदेशानुसार रद्द होणार आहेत. नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाचेही असेच चित्र आहे. १७७० परवान्यांना मंजुरी मिळाली असता केवळ १३१ परवान्यांचे वितरण झाले. तब्बल १६३९ परवाने अद्यापही पडून आहेत.

Web Title: Text of autorickshaw drivers for license renewal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.