तंबाखूमुळे होतात पती-पत्नीत भांडण
By Admin | Updated: June 1, 2016 02:54 IST2016-06-01T02:54:40+5:302016-06-01T02:54:40+5:30
कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या ७० ते ८० टक्के प्रकरणांमध्ये पती-पत्नीमधील भांडणाचे कारण तंबाखू ,

तंबाखूमुळे होतात पती-पत्नीत भांडण
नागपूर : कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या ७० ते ८० टक्के प्रकरणांमध्ये पती-पत्नीमधील भांडणाचे कारण तंबाखू , गुटखा, मद्य आणि इतर मादक पदार्थ असल्याचे दिसून येत असल्याचे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ई. म. बोहरी यांनी सांगितले.
कौटुंबिक न्यायालयात कौटुंबिक न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रास्ताविक भाषण करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. मुजीबुद्दीन आणि अॅड. श्याम अंभारे उपस्थित होते.
बोहरी पुढे म्हणाले की, प्रत्येक पत्नीला आपल्या पतीला ‘खाल जर्दा तर होईल मुर्दा’, असे सांगण्याची वेळ आली आहे. व्यसन कुठलेही असो ते वाईटच आहे. त्याच्या दुष्परिणामाबाबत वारंवार सांगूनही मनावर ताबा नसेल तर ती व्यक्ती त्यात गुरफटली जाते आणि पुढे जाऊन अशी व्यक्ती व्यसनाधीन होते. तंबाखू हे कुटुंब, समाज आणि देश या सर्वांच्या हितासाठी घातकच ठरते.
सुप्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी सांगितले की, तंबाखूमध्ये असणारा निकोटिन नावाचा पदार्थ हा कर्करोगाला आमंत्रित करणारा असल्याने, त्यापासून दूर राहण्याचे त्यांनी आवाहन केले. निकोटिन हा स्लो पॉयझन आहे. तंबाखूमध्ये पाच हजार रसायने असतात. त्यापैकी २७० रसायने घातक आणि ६९ रसायने कर्करोगाची शक्यता वाढविणारे आहेत. तंबाखू व इतर मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते, असेही त्यांनी सांगितले. आपल्या स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींना कर्करोग झाल्यामुळे त्यांच्या वेदना आपण जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे तंबाखू व इतर मादक पदार्थांपासून दूर राहण्याची कळकळीची विनंती त्यांनी केली.
धूम्रपानाचा स्त्रियांनाही फटका
नागपूर : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर म्हणाले की, ज्या स्त्रिया तंबाखूचे सेवन करतात किंवा धूम्रपान करतात त्याचा गर्भावर परिणाम होतो. स्त्री गर्भवती असताना तंबाखू किंवा तत्सम पदार्थांचे सेवन केल्याने बाळाला निमोनिया, अस्थमा व इतर रोग होण्याची शक्यता बळावते. कधी कधी मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तंबाखू किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करताना सुरुवातीला चांगले वाटत असले तरी त्याचे दुष्परिणाम नंतर भोगावे लागतात. (प्रतिनिधी)