कोरोना काळात सोशल मीडिया वाढवतोय तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:38+5:302021-04-07T04:08:38+5:30

- विश्लेषक म्हणताहेत, मीडिया एज्युकेट होण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात माध्यमांवरील पॉझिटिव्ह-निगेटिव्ह मेसेजच्या भडिमाराने ...

Tensions are rising on social media during the Corona period | कोरोना काळात सोशल मीडिया वाढवतोय तणाव

कोरोना काळात सोशल मीडिया वाढवतोय तणाव

- विश्लेषक म्हणताहेत, मीडिया एज्युकेट होण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात माध्यमांवरील पॉझिटिव्ह-निगेटिव्ह मेसेजच्या भडिमाराने सर्वसामान्यांच्या आयुष्यात तणावसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जणू प्रत्येकच व्यक्ती आजारी असल्याचा भास होत आहे. कोरोना कधीच संपणार नाही, संक्रमणासोबतच जगण्याची सवय पाडावी लागेल, भारतीय उपचार बिनकामाचे, लसीकरण धोक्याचे, अशा संदेशांनी सुशिक्षितही हैराण झाले आहेत. या मेसेज कंटेंटच्या षडयंत्राला प्रत्येकच जण बळी पडतो आहे. त्याच्या परिणामी मेसेज कंटेंटनुसार चुकीचे उपचार केले जात आहेत. त्याचा परिणाम कोरोना तर दूरच वेगळ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय क्षेत्रावरही अविश्वास वाढला आहे. त्यामुळे, प्रत्येकाने मीडिया एज्युकेट होण्याची गरज असल्याचे मत सोशल मीडिया विश्लेषक करीत आहेत.

-------------

सोशल मीडियाचा खेळ

* सोशल मीडिया हा एक उद्योग असून, दररोज ५०० कोटी मेसेज कंटेंट व्हायरल केले जातात.

* व्यक्तीच्या इंटरेस्टनुसार कंटेंट तयार केले जातात. उदा. धार्मिक, सेक्स, जातीय तेढ, कोरोना संक्रमण आदी.

* उपभोक्ता चिंतामग्न होत असल्याने जितका भ्रमित होईल तितकाच सोशल मीडियाचा होतो.

* संदेशांचा भडिमार होत असल्याने खोट्या गोष्टी खऱ्या आणि खऱ्या गोष्टी खोट्या समजावण्याचा प्रयत्न केला जातो.

* वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रॉडक्ट, कंपन्यांना उपभोक्त्याच्या भ्रामकतेचा लाभ होतो आणि उपभोक्ता तणावात राहत आहे.

------------------

सोशल माध्यमांच्या अराजकतेपासून वाचण्याचे उपाय

* सोशल मीडिया एज्युकेशनची गरज. अनोळखी व्यक्तीच्या संदेशावर प्रतिसाद का द्यावा, हा प्रश्न निर्माण होणे गरजेचे.

* शालेय जीवनातच इतर विषयांसोबतच सोशल मीडिया एज्युकेशनचा विषय अभ्यासात येणे गरजेचे.

* नो डिलिट, नो रिस्पॉन्सची सवय महत्त्वाची.

* पारंपरिक माध्यमांवरच जसे वृत्तपत्रे, दूरदर्शन आणि तज्ज्ञांवरच विश्वास ठेवणे महत्त्वाचे.

* फॉरेन फोबिया अर्थात जागतिक लोकांवरच विश्वास ठेवणे चुकीचे. तुमच्या देशाची मानसिकता, आरोग्याची स्थिती त्यांना नाही, ही बाब समजून घ्यावी.

* सत्य ओळखण्याची क्षमता निर्माण करणे, प्रश्न उपस्थित होण्याची सवय लावणे महत्त्वाचे.

----------------------

पारंपरिक ते न्यू मीडिया ट्रान्झेक्शन अचानक झालेले आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून नागरिकांना वाचविण्याची सर्वांत मोठी जबाबदारी पारंपरिक माध्यमांचीच आहे. नैराश्य हा आजार नाही, तर ते एक सिम्प्टम हे समजून घेणे महत्त्वाचे. त्यासाठी माध्यम साक्षरतेची जाणीव शिक्षणाच्या पातळीवरच विकसित करावी लागणार आहे.

- डॉ. मोईज हक, विभाग प्रमुख, जनसंवाद विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विश्वविद्यालय.

----------------

सोशल मीडिया म्हणजे प्रोटोगोनिस्ट अर्थात सकारात्मक व ॲण्टोगोनिस्ट अर्थात नकारात्मकतेचे द्वंद्व आहे. ऐकिवात गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे प्रमाण मोठे आहे. युरोप, अमेरिकेत सोशल माध्यमांवरील अवाजवी संदेशांना नाही म्हणण्याची प्रक्रिया मोठी आहे. त्या तुलनेत भारतात ही प्रक्रिया अजून रूढ व्हायची आहे. या संदेशांचे सत्यापित स्रोत शोधण्याची वृत्ती वाढीस जेव्हा लागेल, तेव्हा भारतीय माणूस सोशल माध्यमांना बळी पडणार नाही.

- डॉ. धर्मेश धवणकर, प्राध्यापक, जनसंवाद विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विश्वविद्यालय

------------------

सोशल मीडियामुळे प्रत्येकच जण स्वत:चे दैनंदिन जीवन विसरायला लागला आहे. कोरोना संक्रमितांचे आकडे, मृत्यू बघण्याकडे कल वाढला आहे. मात्र, त्यातून काहीच साध्य होणार नाही. तुम्हाला तुमचे जीवन जगायचेच आहे. अशा स्थितीत दैनंदिनीला हरताळ न फासता सोशल मीडियावरील मेसेज कंटेंटकडे दुर्लक्ष करण्याची गरज आहे.

- प्रा. राजा आकाश, मानसोपचारतज्ज्ञ

.....................

Web Title: Tensions are rising on social media during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.