दोन गटातील वादामुळे तणाव
By Admin | Updated: May 3, 2015 02:05 IST2015-05-03T02:05:53+5:302015-05-03T02:05:53+5:30
धार्मिक स्थळाच्या मुद्यावरून दोन समुदायात झालेला वाद सामोपचाराने मिटविण्यात आला.

दोन गटातील वादामुळे तणाव
नागपूर : धार्मिक स्थळाच्या मुद्यावरून दोन समुदायात झालेला वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. परंतु पोलिसांच्या अडेलतट्टूपणामुळे वस्तीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विरोधात प्रियदर्शिनी नगरातील महिला साखळी उपोषणावर बसल्या आहे.
त्रिमूर्तीनगर एनआयटी गार्डनमागे प्रियदर्शिनीनगर नगर येथील एनआयटीच्या मालकीच्या परंतु सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर दोन वेगवेगळ्या समाजाचे धार्मिक बांधकाम आहे. एकाचे काम पूर्ण तर दुसऱ्याचे अर्धवट अवस्थेत आहे. गेल्या ३५ वर्षात यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. मात्र अर्धवट अवस्थेतील बांधकामावर आक्षेप घेऊन काही लोकांनी पोलीस व नासुप्रकडे तक्रार केली. यावरून पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईने नागरिक संतापले. त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. यानंतर घटनास्थळासह संपूर्ण वस्तीत पोलीस तैनात करण्यात आले.
पोलिसांच्या बळजबरीविरुद्ध आणि नासुप्रच्या पक्षपाती धोरणाचा निषेध म्हणून महिलांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान नगरसेवक आणि काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नगरसेविका उज्ज्वला बनकर यांनी मध्यस्ती केली. दोन्ही गटाच्या लोकांना राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात एकत्र बसवून वाद मिटविण्यात आला. तसे लिहून सुद्धा घेण्यात आले, असे असतानाही पोलिसांनी वस्तीतील बंदोबस्त मागे घेतला नाही. विचारणा केली तेव्हा नासुप्रने तक्रार केल्याचे कारण सांगण्यात आले. येथील नागरिक आणि नगरसेवक नासुप्रमध्ये गेले. नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा पोलीस मदतीची आता गरज नसल्याचे लिहून दिले, त्यानंतरही पोलीस हटायला तयार नाहीत. पोलिसांनी बंदोबस्ताच्या नावाखाली वस्तीतील नागरिकांना एकाप्रकारे वेठीस धरून ठेवले आहे. (प्रतिनिधी)