नागपूर वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानकाची निविदा रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST2021-02-16T04:09:26+5:302021-02-16T04:09:26+5:30

लोकमत विशेष आनंद शर्मा नागपूर : इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन(आयआरएसडीसी)च्या वतीने नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास बनविण्यासाठी निविदा जारी ...

Tender for Nagpur World Class Railway Station stalled | नागपूर वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानकाची निविदा रखडली

नागपूर वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानकाची निविदा रखडली

लोकमत विशेष

आनंद शर्मा

नागपूर : इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन(आयआरएसडीसी)च्या वतीने नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास बनविण्यासाठी निविदा जारी करण्यात उशीर होत आहे. पूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये ही निविदा निघणार होती. त्यासाठी आयआरएसडीसीला जुलै २०२० पूर्वी नऊ मोठ्या कंपन्यांकडून सहा अर्ज मिळाले होते. याच कंपन्या निविदा प्रक्रियेत भाग घेतील. परंतु वर्ल्ड क्लास झाल्यानंतर प्रवाशांकडून घेण्यात येणारा अतिरिक्त युझर चार्ज ठरविण्यात न आल्यामुळे आणि त्याची अधिसूचना जारी न झाल्यामुळे निविदा प्रक्रिया रखडली आहे. कोणत्याही परिस्थितीत नागपूर वर्ल्ड क्लास स्टेशनसाठी निविदा काढण्यात येणार असल्याचा दावा आयआरएसडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला होता. परंतु त्यांचा दावा फोल ठरला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरएसडीसीने नागपूर वर्ल्ड क्लास स्टेशनच्या निविदेचा जो मसुदा तयार केला आहे, तो मंजुरीसाठी आता रेल्वे बोर्ड आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे बोर्ड आणि केंद्रीय वित्त मंत्रालय सर्व तांत्रिक आणि आर्थिक बाबी पाहून निविदा मसुद्याला मंजुरी देईल. त्यानंतरच नागपूर वर्ल्ड क्लास रेल्वेस्टेशनसाठी निविदा काढण्यात येईल. यात आणखी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आयआरएसडीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. लोहिया यांच्याशी संपर्क साधण्याचा संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. आयआरएसडीसीने नागपूर, ग्वाल्हेर, अमृतसर आणि साबरमती स्टेशनच्या पुनर्विकासासाठी डिसेंबर २०१९ मध्ये अर्ज मागविले होते. हे अर्ज २५ जून २०२० मध्ये उघडण्यात आले. यातील नऊ मोठ्या कंपन्यांनी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे कंत्राट मिळविण्यासाठी वेगवेगळे सहा अर्ज दिले. नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचा खर्च ३७२ कोटी रुपये आहे. त्यासाठी रेल्वे आणि आयआरएसडीसीमध्ये स्टेशन व्यवस्थापन करार प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.

...........

इनियाची आर्किटेक्चरल डिझाईन फायनल

आयआरएसडीसीने नागपूर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास (वर्ल्ड क्लास) करण्यासाठी २० नोव्हेंबर २०१७ रोजी जागतिकस्तरीय आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धा घेतली होती. त्यात फ्रान्सच्या इनिया कंपनीला १९ जुलै २०१८ रोजी एका कराराच्या माध्यमातून स्टेशनचे आर्किटेक्चरल डिझाईन तयार करण्याचे काम सोपविले होते. इनिया कंपनीने पूर्वी नागपूर वर्ल्ड क्लास स्टेशनसाठी जे डिझाईन सोपविले ते नामंजूर करण्यात आले. त्यानंतर आता नवे डिझाईन देण्यात आले आहे. सध्या हे डिझाईन अंतिम समजण्यात येत आहे.

अजनी आयएमएसमुळे रेल्वेत द्विधा मन:स्थिती

अजनीत इंटर मॉडेल रेल्वेस्टेशन प्रकल्प प्रस्तावित आहे. अशात नागपूर शहरात दोन रेल्वेस्थानकांचा जागतिक स्तरावरील विकास करण्याबाबत द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, एकाच शहरात दोन रेल्वेस्थानकांच्या अत्याधुनिक विकासावर कोट्यवधी रुपये खर्च करणे योग्य होणार नाही. अजनीत विकासासाठी पुरेशी जागा आहे. तर ऐतिहासिक इमारत असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावर जागेची कमतरता आहे. नागपूर वर्ल्ड क्लास स्टेशनच्या निविदेत होत असलेली दिरंगाई याचे कारण मानण्यात येत आहे.

नागपूर वर्ल्ड क्लास स्टेशन दृष्टिक्षेपात

- नागपूर वर्ल्ड क्लास स्टेशनच्या विकासासाठी नऊ कंपन्यांनी दिले सहा अर्ज

- प्रकल्पाचा एकूण खर्च ३७२ कोटी रुपये

- निविदेसाठी रेल्वे बोर्ड, वित्त मंत्रालयाकडून घेणार मंजुरी

- फ्रान्सच्या इनिया कंपनीच्या डिझाईनची निवड

......

Web Title: Tender for Nagpur World Class Railway Station stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.