दहा हजार लोकांनी घेतली बुद्ध धम्माची दीक्षा
By Admin | Updated: October 2, 2014 01:06 IST2014-10-02T01:06:19+5:302014-10-02T01:06:19+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ५८ वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या पवित्र स्थळाची माती आपल्या कपाळी लावून बुधवारी जवळपास दहा हजार लोकांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली;

दहा हजार लोकांनी घेतली बुद्ध धम्माची दीक्षा
दोन हजारांवर झाले श्रामणेर : भंते सुरेई ससाई यांच्या हस्ते घेतली दीक्षा
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ५८ वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या पवित्र स्थळाची माती आपल्या कपाळी लावून बुधवारी जवळपास दहा हजार लोकांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली; त्याचबरोबर दोन हजार लोकांनी श्रामणेर दीक्षासुद्धा घेतली. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी त्यांना दीक्षा दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळी ९.३० वाजता धम्मदीक्षा सोहळ्याला सुरुवात झाली. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून समारंभाला प्रारंभ केला. भंते ससाई यांच्या नेतृत्वात भंते अश्वघोष, भंते नागघोष, भंते नागवंश, भंते धम्मबोधी, भंते धम्मरत्न, भंते उपाली, भंते कुमारकश्यप आणि भंते नागसेन यांनी दीक्षा प्रदान केली. याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, सदस्य सर्वश्री विजय चिकाटे, सुधीर फुलझेले, एन.आर. सुटे, विलास गजघाटे यांच्यासह डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश खरात, रजिस्ट्रार जोसेफ प्रामुख्याने उपस्थित होते. रात्रीपर्यंत दीक्षा सोहळा सुरु होता.
उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी आपापल्या ग्रुपने येऊन बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. प्रत्येकांना त्रिशरण पंचशील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा देऊन दीक्षा देण्यात आली.
तसेच प्रत्येक दीक्षार्थ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रमाणपत्रसुद्धा प्रदान करण्यात आले, तसेच दोन हजारावर लोकांनी श्रामणेर दीक्षासुद्धा घेतली. त्यांनासुद्धा प्रमाणपत्र देण्यात आले.
हा दीक्षाविधी सोहळा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यापर्यंत राहील.
कार्यक्रमासाठी कैलाश वारके, अरुण कावळे, मनोज राऊत, गौतम अंबादे, शरद मेश्राम, रवी मेंढे, देवाजी रंगारी, प्रदीप डोंगरे परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)
आज जागतिक धम्म परिषद
धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यानिमित्त दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या सोहळ्यांतर्गत उद्या, गुरुवार २ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जागतिक धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे अध्यक्षस्थानी राहतील. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. या परिषदेला थायलंड, जपान, कम्बोडिया, श्रीलंका, लाओस या देशातील भिक्खू व बौद्ध नेते मार्गदर्शन करतील. एस.के. गजभिये हे मराठी आणि हिंदीमध्ये अनुवाद करतील. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी स्मारक समितीचे सदस्य ज.म. मूल यांच्या हस्ते पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात येईल. समितीचे सदस्य विजय चिकाटे अध्यक्षस्थानी राहतील तर एन.आर. सुटे हे प्रमुख अतिथी राहतील.
थायलंडमधील बौद्ध विचारवंतांची विशेष उपस्थिती
यंदाच्या धम्मदीक्षा सोहळ्याला थायलंड येथील मेजर जनरल थानसक पोमपेच्च आणि डॉ. रंगथिप चोटनापलाई हे मुख्य अतिथी राहणार आहेत. परंतु त्यांच्यासोबत तब्बल ३८ बौद्ध विचारवंतांचीसुद्धा विशेष उपस्थिती राहील. यात पटछाया फट्टाराचैरॉन, सियारट फोटीबुसायावट, चुटीमा अनंथराप्रयून, राविवान थिरावल, नफाटसोर्न फाटसोर्नपियासक, पीमलाडा पट्टनावोंगकित्ती, फ्रामाहा विनीत फारचरून, फेरा साकोर्न वाट्टाना, रविवान खंजानाविसीट्टाफोल, वान्ना वाटचरसक्त्रकूल, सुकिटा सुकपुन्टावी, चनाटदा लोईखाओफोंग, नीड लाओपोंगसोर्न, नारीत बैंगम, नारीलूक सुत्तीरुत, जरुनान मोंगक्लाकोर्न, रविवान ओराओन, जंतना डुंगमानी, डुट्साडीफट रोतखाजोर्नवानीत, मानाफाथ्थाना रोतखाजोर्नवानीत, सुत्तीमोन चैहोउदजारोईन, अरुणी ओ-चारोईन आदींचा समावेश आहे.