वायुप्रदूषणावर तंत्रज्ञानातून नियंत्रण शक्य
By Admin | Updated: August 7, 2014 01:01 IST2014-08-07T01:01:21+5:302014-08-07T01:01:21+5:30
आजच्या काळात वायुप्रदूषण सर्वात मोठ्या अन् गंभीर समस्येचे रूप घेत आहे. जगभरातील देशांमधून यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे अन् त्यावर तंत्रज्ञानातूनच नियंत्रण आणणे शक्य आहे

वायुप्रदूषणावर तंत्रज्ञानातून नियंत्रण शक्य
पी. के. सेठ : ‘नीरी’त तज्ज्ञांनी टाकला निरनिराळ्या मुद्यांवर प्रकाश
नागपूर : आजच्या काळात वायुप्रदूषण सर्वात मोठ्या अन् गंभीर समस्येचे रूप घेत आहे. जगभरातील देशांमधून यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे अन् त्यावर तंत्रज्ञानातूनच नियंत्रण आणणे शक्य आहे असे मत लखनौ येथील ‘बायोटेक पार्क’चे सीईओ प्रा.पी.के.सेठ यांनी व्यक्त केले. ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘एअर पॉल्युशन इंड्युस्ड हेल्थ इफेक्ट्स, हेल्थ रिस्क असेसमेन्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्ट अॅन्ड डेमॉस्ट्रेशन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेला सेठ यांच्यासोबतच सेसा स्टरलाईट अॅन्ड वेदांत प्रा.लि.चे महाव्यवस्थापक डॉ.कुमारा वेदान, व्हीएनआयटीचे प्राध्यापक डॉ.टी.चक्रबर्ती, ‘आयसीएमआर’चे (इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च) उप महासंचालक डॉ.आर.एस.धारीवाल, ‘नीरी’चे संचालक डॉ.सतीश वटे व आयोजन सचिव डॉ.के.कृष्णमूर्ती हे प्रामुख्याने उपस्थित होते. चार भिंतींच्या आतमध्ये असलेल्या वायुप्रदूषणामुळे १६ लाख लोकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. याशिवाय कोट्यवधी लोकांना वायुप्रदूषणामुळे इतरही आजार झाले आहेत. जर वायुप्रदूषणावर नियंत्रण आणले तर सुमारे सव्वा कोटी लोकांना प्राणांतिक आजारांपासून वाचविता येईल. यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सखोल संशोधनावर भर देण्याची गरज असल्याचे प्रा.सेठ यांनी बोलून दाखविले. कार्यशाळेदरम्यान डॉ.चक्रबर्ती यांनी वातावरणातील मँगनीजचे प्रमाण आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकला. वाढते तापमान आणि वातावरणातील प्रदूषणाची पातळी यामुळे श्वसनाशी संबंधित रोग वाढीस लागले आहे असे डॉ.चक्रबर्ती म्हणाले. यावेळी डॉ.धारीवाल, डॉ.वेदान यांनीदेखील वायुप्रदूषण, तंत्रज्ञान आणि उद्योग यांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी तीन वैज्ञानिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. यात ‘एअर क्वॉलिटी मॉनिटरींग अॅन्ड मॉडेलिंग’, ‘आॅक्युपेशनल हेल्थ रिस्क असेसमेन्ट’ इत्यादी मुद्यांवर तज्ज्ञांनी भाष्य केले.
याअगोदर ‘नीरी’चे संचालक डॉ.सतीश वटे यांनी प्रदूषणाच्या अभ्यासासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘सॉफ्टवेअर’संदर्भात उपस्थितांना माहिती दिली. ‘नीरी’ची स्थापनाच वातावरणाच्या अभ्यासासाठी झाली होती व त्याच मार्गावर संस्थेचे काम सुरू आहे असे ते म्हणाले. कार्यशाळेचे आयोजन सचिव डॉ.के.कृष्णमूर्ती यांनी या कार्यशाळेची प्रस्तावना मांडली. डॉ.पी.के.नवघरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)