नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक यंदा कर्नाटकातील बंगळुरू येथे होणार आहे. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही बैठक बंगळुरू येथील चेन्नन हल्ली गुरुकुलम येथे १९ आणि २० मार्च रोजी होणार आहे. दर तीन वर्षांनी नागपुरात ही बैठक होत असते. मात्र यंदा कोरोनामुळे बंगळुरू येथे संघमंथन होईल. २०२० ची बैठक रद्द करण्यात आली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रतिनिधी सभा ही धोरण निर्धारित करणारी समिती असते. वर्षभरातून एकदा प्रतिनिधी सभेची बैठक घेतली जाते. तसेच या बैठकीत दर तीन वर्षांनी सरकार्यवाह निवडले जातात. निवडणुकीच्या वर्षी ही बैठक नागपुरात होते. यंदा २०२१ हे सरकार्यवाहांच्या निवडीचे वर्ष असून, ही बैठक नागपुरात होणे अपेक्षित होते. बंगळुरू येथे होणारी प्रतिनिधी सभेची पाचवी आणि कर्नाटकात होणारी सातवी बैठक आहे. या बैठकीत संघाच्या कामाची समीक्षा आणि कार्यविस्तारावर चर्चा होणार आहे. संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रतिनिधी सभेची निवडणूक नागपूरच्या बाहेर होणार आहे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह सुरेश (भय्याजी) जोशी, सर्व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांसह सहयोगी संघटनांचे सुमारे ७०० प्रतिनिधी सहभागी होतील.
- निम्मेच प्रतिनिधी सहभागी होणार
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर यंदा बैठकीत सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींची संख्या निम्म्यावर आणण्यात आली. यंदा १४०० ऐवजी ७०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच नागपूरच्या तुलनेत बंगळुरू येथील जागा ऐसपैस असल्यामुळे त्याठिकाणी सुरक्षित अंतर राखत बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.