संघाचा दबाव की परवानगीचा घोळ?

By Admin | Updated: March 17, 2017 03:07 IST2017-03-17T03:07:53+5:302017-03-17T03:07:53+5:30

कम्युनिस्ट पक्षाचे नेते व खासदार सीताराम येचुरी यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम तडकाफडकी स्थगित केल्यामुळे

The team's pressure to allow permission? | संघाचा दबाव की परवानगीचा घोळ?

संघाचा दबाव की परवानगीचा घोळ?

विद्यापीठ प्रशासनाचे मौन सीताराम येचुरींचा कार्यक्रम स्थगित करण्याबाबत संभ्रम कायम आंबेडकरी विचारसरणीच्या नेत्यांनी घेतली कुलगुरूंची भेट
नागपूर : कम्युनिस्ट पक्षाचे नेते व खासदार सीताराम येचुरी यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम तडकाफडकी स्थगित केल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात खळबळ माजली आहे. परवानगीच्या घोळामुळे कार्यक्रम स्थगित झाला की संघ परिवाराच्या दबावातून हे पाऊल उचलण्यात आले, याबाबत चर्चांना उधाण आले होते. संबंधित कार्यक्रम स्थगित करण्याबाबत कुलगुरूंसह प्रशासनाने ठोस कारण दिलेले नाही. त्यामुळे संभ्रम वाढीस लागला आहे. दरम्यान, आंबेडकर विचारसरणीच्या नेत्यांनी व विचारकांनी कुलगुरूंची भेट घेऊन कार्यक्रम स्थगित न करण्याचे आवाहन केले.
विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे १८ व १९ मार्च रोजी दीक्षांत सभागृहात ‘भारतीय लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सीताराम येचुरी यांना मुख्य वक्ते म्हणून बोलावण्यात आले होते व याच्या पत्रिकादेखील छापण्यात आल्या. काही पत्रिकांचे तर वितरणदेखील झाले होते. मात्र बुधवारी संबंधित कार्यक्रम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे पत्र जारी करण्यात आले. यावरुन विद्यापीठासोबतच आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांमध्येदेखील नाराजीचा सूर होता.
गुरुवारी दुपारी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्यासह आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंची भेट घेतली. हा कार्यक्रम रद्द का केला, असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. हा कार्यक्रम रद्द करण्यामागे कुणाचाही दबाव नसून अंतर्गत प्रशासकीय कारणांमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. लवकरच हा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असेदेखील कुलगुरूंनी सांगितले असल्याची माहिती राऊत यांनी दिली. कुलगुरूंनी नेमके कारण स्पष्ट करायला हवे. हा कार्यक्रम व्हायलाच हवा, अशी मागणी डॉ. मनोहर यांनी केली. यावेळी आंबेडकरी चळवळीचे ताराचंद्र खांडेकर, नागेश चौधरी, प्रा.प्रकाश खरात, अमन कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.(प्रतिनिधी)

अध्यासन प्रमुख म्हणतात, परवानगी घेतली
संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात अध्यासनप्रमुखांनी रीतसर परवानगी घेतली होती, मात्र सीताराम येचुरी हे येणार असल्याचे कळविले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. कुलगुरूंनी यावर भाष्य केले नाही. केवळ अंतर्गत प्रशासकीय कारणांमुळे कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले. याबाबत अध्यासन प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी आपण परवानगी घेतली होती व सीताराम येचुरी यांच्याबाबतदेखील कळविले होते, असे सांगितले.

संघाचा संबंध नाही, मग टाळाटाळ का ?
केरळ व पश्चिम बंगालमध्ये डावे विरुद्ध संघ स्वयंसेवक असे चित्र आहे. संघाने काही दिवसाअगोदरच डाव्यांकडून करण्यात येणाऱ्या राजकीय हिंसेच्या विरोधात आंदोलनदेखील केले होते. या पार्श्वभूमीवर डाव्या विचारसरणीच्या येचुरी यांच्यासारख्या नेत्यांचे संघ मुख्यालयाच्या शहरात व्याख्यान होणे योग्य होणार नाही, असे संघ परिवाराकडून सांगण्यात आल्याचा दावा विद्यापीठ वर्तुळात काही लोकांनी केला. मात्र कुलगुरूंनी याला नकार दिला आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, असे त्यांनी सांगितले.
४अभाविप किंवा संघ परिवाराच्या कुठल्याही संघटनेकडून विद्यापीठाला याबाबत निवेदनदेखील प्राप्त झाले नाही. नितीन राऊत यांनीदेखील नागपुरात असे कुणी करणार नाही, असे मत व्यक्त केले. जर संघाचा काहीही संबंध नाही, तर मग कार्यक्रम स्थगित करण्यामागचे नेमके कारण सांगण्यास टाळाटाळ का करण्यात येत आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

 

Web Title: The team's pressure to allow permission?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.