चेन्नईकरांच्या मदतीला संघाचे स्वयंसेवक
By Admin | Updated: December 4, 2015 03:05 IST2015-12-04T03:05:41+5:302015-12-04T03:05:41+5:30
तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नई व उत्तर तामिळनाडूमध्ये अक्षरश: आणीबाणी निर्माण झाली आहे.

चेन्नईकरांच्या मदतीला संघाचे स्वयंसेवक
सेवा भारतीचा पुढाकार : देशभरातून मदतीचे आवाहन
योगेश पांडे नागपूर
तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नई व उत्तर तामिळनाडूमध्ये अक्षरश: आणीबाणी निर्माण झाली आहे. शासकीय पातळीवर येथे नागरिकांना मदत केली जात असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनीदेखील तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. सेवा भारती या संघ परिवारातील संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याचे काम सुरू झाले असून देशभरातील अनेक स्वयंसेवक अन्न, औषधे व कपडे घेऊन चेन्नईकडे रवाना झाले आहेत.
दोन दिवस झालेल्या अभूतपूर्व पावसाने चेन्नईतील जनजीवन कल्पनातीत पद्धतीने विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीज, मोबाईल नेटवर्क, एटीएम, बँकसेवा बंद असून असून पिण्याचे पाणी व अन्नाची टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीत तातडीने संघाचे स्वयंसेवक धावून गेले असल्याची माहिती संघ मुख्यालयातील सूत्रांनी दिली आहे. साचलेल्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना अन्न, पाणी तसेच औषधांची पाकिटे पोहोचविली जात आहेत. शिवाय तामिळनाडूच्या निरनिराळ्या भागांत हजारांहून अधिक स्वयंसेवक निरनिराळे गट पाडून पडेल ती कामे करीत आहेत.
स्वयंसेवकांनी घरातून पाणी बाजूला सारण्यापासून ते तात्पुरते निवारे उभारण्यापर्यंतची कामे प्रारंभ केली आहेत. शिवाय पूरग्रस्त नागरिकांच्या आरोग्याची निगा राखण्याचे कार्यदेखील हाती घेतले आहे. देशभरातून स्वयंसेवकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले असून, पूरग्रस्त नागरिकांच्या खाण्यापिण्याची आणि निवासाची योग्य व्यवस्था होईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तेथे कार्य करीत राहणार आहेत, अशी माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
ग्रामीण भागांतदेखील पूरग्रस्तांना हात
चेन्नईच्या जवळपासच्या ग्रामीण परिसरात प्रशासकीय कर्मचाऱ्यांसोबत संघाचे स्वयंसेवकदेखील मदत व पुनर्वसन कार्यात लागले आहेत. कांचीपुरम, तिरवल्लूर व कुड्डलूर जिल्ह्यांमध्येही पावसाने कहर केला आहे. गुरुवारी कुडुलूरमध्ये तीन हजार, मडिपक्कम येथे हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत अन्नाची पाकिटे पोहोचविण्यात आली. याशिवाय वेल्लोर जिल्ह्यातून ग्रामीण भागासाठी मदतीचे ट्रक रवाना झाले आहेत. चेन्नईत १५ हजारांहून अधिक नागरिकांना अन्न, पाणी व औषधांच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.