मेट्रो रेल्वेला कर्ज देण्यासाठी जर्मनीतील बँकेची चमू येणार
By Admin | Updated: October 11, 2015 03:02 IST2015-10-11T03:02:17+5:302015-10-11T03:02:17+5:30
महत्त्वाकांक्षी ‘मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाच्या उभारणीसाठी ‘नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीला (एनएमआरसीएल)

मेट्रो रेल्वेला कर्ज देण्यासाठी जर्मनीतील बँकेची चमू येणार
‘केएफडब्ल्यू’चा पाच दिवसीय दौरा : विविध कार्याची पाहणी
नागपूर : महत्त्वाकांक्षी ‘मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाच्या उभारणीसाठी ‘नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीला (एनएमआरसीएल) जर्मनी येथील केएफडब्ल्यू बँक जवळपास ३७०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यास तयार झाली आहे. हे कर्ज ‘एनएमआरसीएल’ला २० वर्षांत चुकते करायचे आहे. कर्जासंदर्भातील नियम आणि अटींना मूर्त रूप देण्यासाठी केएफडब्ल्यू बँकेच्या अधिकाऱ्यांची चमू १२ आॅक्टोबरला पाच दिवसीय दौऱ्यावर नागपुरात येत आहे. (प्रतिनिधी)
प्रकल्पाच्या कामांची पाहणी
दौऱ्यादरम्यान अधिकारी मेट्रो रेल्वेच्या उभारणीचे नियोजन, शेड्यूल, धोरण आणि नियोजनबद्ध टप्प्याची माहिती जाणून घेणार आहेत. यासह ही चमू मेट्रो रेल्वेचे एकीकरण स्थळ आणि डेपोच्या जागेची पाहणी करतील. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. या दरम्यान फिडर सेवा, सोलर पॅनल सेटअप, कॉमन मोबिलिटी कार्ड, वाहतूक कायदा, कार्यान्वयन, देखभाल, प्रकल्पाचे डिजिटल व्यवस्थापन आदींवर विस्तृत बातचित करणार आहेत. केएफडब्ल्यू बँकेचे अधिकारी ‘एनएमआरसीएल’च्या अधिकाऱ्यांसोबत मेट्रो रेल्वेची वित्तीय व्यवहार्यता आणि काटेकोर नियोजनावर चर्चा करतील.
राज्य शासनाची चर्चा
दौऱ्यादरम्यान बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक नागरी विकास विभागाचे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) आणि महाराष्ट्र सरकारच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत होणार आहे. यावेळी केएफडब्ल्यूतर्फे देण्यात येणाऱ्या कर्जावरही चर्चा होईल.
बँकेच्या सहकार्याची अपेक्षा
दौऱ्यावर ‘एनएमआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, ‘एनएमआरसीएल’च्या मेट्रो रेल्वे प्रकल्पात ‘केएफडब्ल्यू’ची रुची पाहून आनंदी आहोत. हा प्रकल्प लवकरच साकार होण्यासाठी बँकेचे सक्रिय सहकार्य मिळत राहील, अशी अपेक्षा आहे.