आंतरजिल्हा बदल्या बंद करण्याविराेधात शिक्षक संघटना आक्रमक
By निशांत वानखेडे | Updated: July 11, 2023 18:47 IST2023-07-11T18:46:48+5:302023-07-11T18:47:07+5:30
शिक्षक सहकार संघटनेचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना

आंतरजिल्हा बदल्या बंद करण्याविराेधात शिक्षक संघटना आक्रमक
नागपूर : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रद्द करण्याच्या निर्णयाविराेधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षक सहकार संघटनेतर्फे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना १० हजार नाराज शिक्षकांच्या डिजिटल स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर केले.
शिक्षण विभागाणे ऑनलाईन बदली रद्द करण्याबाबत २१ जून राेजी पत्र काढले. या निर्णयाविरोधात राज्यातील हजारो शिक्षकांमधे तिव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या १५ ते २० वर्षापासून हजाराे शिक्षक आंतर जिल्हा बदलीद्वारे स्वजिल्ह्यात येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयाने त्यांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत.
नवीन शिक्षक भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा तात्काळ राबविण्यात यावा, २०२२ मध्ये जिल्हा बदली करू न शकणाऱ्या शिक्षकांना ऑनलाईन पाेर्टलवर नव्याने अर्ज करण्याची संधी मिळावी, बदली धाेरणातील किमान ५ वर्षाची अट हटवून ३ वर्षाची करण्यात यावी, सुधारित बदली धाेरण आणून पूर्वीप्रमाणे ऑनलाईन प्रणालीने आंतरजिल्हा बदल्या सुरू कराव्या व २०२२-२३ या शैक्षणिक सत्रातील बदल्या सुरू कराव्या, नवीन भरतीपुर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे आदी विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
संघटनेच्या मागणीस १२ आमदार व इतर शिक्षक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. शिष्ठमंडळात दिपक परचंडे, मनोज कोरडे, राहुल मसुरे, नागपूर विभागप्रमुख रवी अंबुले, विलास बांगर, मदन खांडेकर आदींचा सहभाग हाेता.