शिक्षकांना कडक भूमिका नडली
By Admin | Updated: May 29, 2015 02:22 IST2015-05-29T02:22:26+5:302015-05-29T02:22:26+5:30
अभ्यासात लक्ष देत नसल्याचे पाहून शिक्षकांनी कडक भूमिका घेतल्यामुळे एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली.

शिक्षकांना कडक भूमिका नडली
विद्यार्थिनीची आत्महत्या : पोलिसांनी गुन्हा नोंदवला
नागपूर : अभ्यासात लक्ष देत नसल्याचे पाहून शिक्षकांनी कडक भूमिका घेतल्यामुळे एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. मात्र, गळफास लावून घेण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवली. ही सुसाईड नोट शिक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात पोहचवणारी ठरली आहे.
बेझनबागमधील लाल शाळेजवळ राहणारी ओसिन अमित गणवीर (वय १६) ही विद्यार्थिनी गुरुनानक ज्युनियर कॉलेजला ११ वीत शिकत होती. ती वर्गात नीट लक्ष न देता गंमतजंमत करायची. त्यामुळे तिच्या शिक्षकांनी कडक भूमिका घेतली. तिला १२ वीच्या अतिरिक्त वर्गाला बसण्यास मनाई केली. एवढेच नव्हे तर तिच्या पालकांना शाळेत बोलवून त्यांच्यासमोर तिची कानउघाडणी केली.
ही बाब ओसिनच्या मनाला लागली. तिने ५ मे च्या सायंकाळी ५ वाजता गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येला तिने प्राचार्य, तसेच अन्य तीन शिक्षकांना कारणीभूत धरले. तिच्या या सुसाईड नोटमुळे तसेच तिचे वडील अमित गणवीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी उपरोक्त चार शिक्षकांवर ओसिनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरू गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)