शिक्षक नियुक्तीसाठी मुदतवाढ देणार?
By Admin | Updated: July 9, 2014 00:56 IST2014-07-09T00:56:37+5:302014-07-09T00:56:37+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये किमान प्राध्यापकसंख्येसंदर्भात गठित करण्यात आलेल्या समितीच्या बैठकांमध्ये अद्यापही ठोस निर्णय निघू शकलेला नाही.

शिक्षक नियुक्तीसाठी मुदतवाढ देणार?
नागपूर विद्यापीठ : समितीच्या बैठकीत अद्याप ठोस निर्णय नाही
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये किमान प्राध्यापकसंख्येसंदर्भात गठित करण्यात आलेल्या समितीच्या बैठकांमध्ये अद्यापही ठोस निर्णय निघू शकलेला नाही. मंगळवारी डॉ. बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. ५० टक्के नियमित शिक्षकांच्या नियुक्तीला काही महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी सूचना या समितीतील सदस्यांकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
२०१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची अट विद्यापीठाने लावली आहे. पारंपरिक, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना ही अट लागू आहे. महाविद्यालयांना जाचक ठरणाऱ्या या अटींवर फेरविचार करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी विद्यापीठ प्राधिकरणांतील सदस्य, महाविद्यालये, प्राचार्य व टीचर्स फोरम इत्यादींकडून करण्यात आली. त्यानुसार यासाठी डॉ. बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली.
या समितीला ७ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु अद्याप या समितीचा कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. बुधवारी या समितीची आणखी एक बैठक बोलाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
...तर १६८ महाविद्यालयांची संलग्नता काढणार
दरम्यान, किमान शिक्षक नियुक्तीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.श्रीकांत कोमावार यांनी दिले आहेत. विद्यापीठात आजच्या घडीला ६६१ महाविद्यालये आहेत. यातील ७५ महाविद्यालये पूर्णवेळ बंद आहेत. या महाविद्यालयांची संलग्नता काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. शिवाय ९३ महाविद्यालयांनी केवळ एकच शिक्षक नियुक्त केला आहे. जर महाविद्यालयांनी मुदतीच्या आत अटींचे पालन केले नाही तर महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील कलम ९१ अंतर्गत या महाविद्यालयांची संलग्नतादेखील काढण्याचे अधिकार विद्यापीठाला आहेत, असे डॉ. कोमावार यांनी स्पष्ट केले. शिक्षक नियुक्तीला मुदतवाढ देणार का, या प्रश्नावर मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.