शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया पुन्हा रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:05+5:302021-04-20T04:08:05+5:30
नागपूर : जि. प.च्या शिक्षण विभागात विषय पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांची ...

शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया पुन्हा रखडली
नागपूर : जि. प.च्या शिक्षण विभागात विषय पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. परंतु जि. प. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही रिक्त पदे भरली जात नसून, त्याचा पर्यवेक्षीय यंत्रणा व शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. अलीकडेच या सर्व पदांकरिता सुरू करण्यात आलेली पदोन्नतीची प्रक्रिया खोळंबल्याचे चित्र दिसून येत आहे.
त्यामुळे या पदांकरिता सुरू करण्यात आलेली पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून विषय पदवीधर शिक्षकांची १००, उच्च श्रेणी मुख्याध्यापक ३८ , केंद्रप्रमुख ११ व शिक्षण विस्तार अधिकारी ११ ही रिक्त पदे शिक्षकांमधून पदोन्नतीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु महिनाभरापेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही ही प्रक्रिया एक टप्पाही पुढे सरकली नाही. दरम्यानच्या काळात जि. प. प्रशासनाकडून शिक्षक समायोजनाची प्रक्रियाही सुरू केली. त्यामुळे पदोन्नतीची प्रक्रिया अलिखितपणे स्थगित केली की काय, असा संभ्रम पदोन्नतीस पात्र ठरणाऱ्या शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.
शिक्षकांचे समायोजन करण्यापूर्वी पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण न करणे ही बाब शासन निर्णयातील तरतुदींशी पूर्णपणे विसंगत असून पदोन्नतीस पात्र शिक्षकांना न्यायोचित संधी नाकारणारी असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे समायोजनापूर्वी शिक्षक पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे आदींनी केली आहे.