नागपूर : दुकानात जाण्यास नकार दिल्यामुळे शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याची घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी २६ मार्चला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ममता गणेश राहुलकर (२९, पाचनल चौक, रामबाग) असे तक्रारकर्त्या आईचे नाव आहे. त्यांची सहा वर्षाची मुलगी समायरा हिला त्यांनी रामबाग कॉलनीतील एका शिक्षिकेकडे १ मार्च २०२२ पासून शिकवणी लावली. ममता याच्या जाऊ वैशाली यांनी २६ मार्चला सकाळी ११ वाजता समायरा हिला शिकवणीसाठी शिक्षिकेच्या घरी सोडले. दुपारी १.३० वाजता ममता या समायराला घेऊन येण्यासाठी गेल्या. येताना समायरा रडत होती. त्यांनी रडण्याचे कारण विचारले असता तिने टिचरने दुकानात न गेल्यामुळे रागाच्या भरात हाताने तोंडावर आणि पाठीवर मारहाण केल्याचे सांगितले. लगेच तिची मेडिकलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या समायराची प्रकृती चांगली आहे. मुलीला मारहाण केल्यामुळे ममता यांनी इमामवाडा पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
............