चहावाल्याच्या मुलीने आणले ‘अच्छे दिन’

By Admin | Updated: June 18, 2014 01:33 IST2014-06-18T01:33:23+5:302014-06-18T01:33:23+5:30

माणसाकडील धनदौलत, संपत्ती कोणीही हिरावून नेऊ शकतो; मात्र विद्येचे धन हिरावून नेता येत नाही. त्यामुळे पोरी, आपल्याकडे पैसा नाही याची खंत बाळगू नकोस़ अभ्यास कर, मोठी हो. मग बघ सुख कसे पाणी भरेल

The Tea Girl Launches 'Good Day' | चहावाल्याच्या मुलीने आणले ‘अच्छे दिन’

चहावाल्याच्या मुलीने आणले ‘अच्छे दिन’

दारिद्र्याशी लढून मिळवले ९३ टक्के गुण
सुमेध वाघमारे- नागपूर
माणसाकडील धनदौलत, संपत्ती कोणीही हिरावून नेऊ शकतो; मात्र विद्येचे धन हिरावून नेता येत नाही. त्यामुळे पोरी, आपल्याकडे पैसा नाही याची खंत बाळगू नकोस़ अभ्यास कर, मोठी हो. मग बघ सुख कसे पाणी भरेल भरेल आपल्या घरी, हे वडिलांचे शब्द तिच्या कानात रुंजी घालत राहायचे़ या शब्दांनीच तिला अभ्यासाची प्रेरणा दिली अन् आज ती दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवू शकली़ या यशस्विनीचे नाव आहे मोहिनी डायरे़मोहिनीने चहा विकणाऱ्या आपल्या गरीब वडिलांना आज खरच चांगले दिवस दाखवले आहेत़
या घवघवीत यशानंतर लोकमतने तिच्या मानेवाडा आकाशनगरातल्या घरी मोहिनीला गाठून बोलते केले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता़ अन् तिचे वडील शेखर, आई सविता आपल्या या लाडक्या लेकीचे कौतुक डबडबल्या डोळ्यांनी पाहत होते.
मोहिनी ही पं. बच्छराज व्यास शाळेतील विद्यार्थिनी आहे. ती म्हणाली, बाबा खूप जास्त शिकले नाही. परंतु त्यांना अभ्यास कसा करावा, हे माहीत आहे. नोट्स काढण्यापासून प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत यासाठी त्यांनी खूप मदत केली. मला गणिताची भीती वाटायची. परंतु माझी ही भीती गेली ती बाबांमुळेच. बाबा पहाटे ४ वाजता उठून चहाटपरीवर जायचे. दुपारी २ वाजता परत यायचे. त्यानंतर पूर्ण वेळ ते माझ्यासोबत असायचे. अभ्यासात मदत करायचे. शिकवणी वर्ग लावण्याइतपत पैसा नव्हता. परंतु बाबांनी कर्ज काढले. गणित, विज्ञान आणि इंग्रजीचे क्लासेस लावले. शाळेतील शिक्षकांनीही बरीच मदत केली. शाळेने शालेय साहित्य आणि ट्युशन फीमध्ये सुट दिली. यामुळेच हे यश गाठता आले. भविष्यात मला आयआयटीतून इंजिनीअरिंग करायचे आहे. माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना मदत करायची आहे, असेही ती म्हणाली.
मोहिनीचे वडील शेखर म्हणाले, मोहिनी हुशार आहे. तिच्या अभ्यासाची जिद्द पाहूनच मलाही बळ मिळते. पूर्वी एका खासगी कंपनीत काम करीत होतो. आठ-दहा हजार रुपये वेतन मिळायचे. परंतु मुलांसाठी वेळ देणे कठीण जात होते.
म्हणून नोकरी सोडली आणि चहाची टपरी लावली. यात पैसे कमी मिळत असलेतरी मुलांच्या शिक्षणात माझी मदत होत आहे याचे समाधान आहे. मोहिनीला आयआयटीतून इंजिनीअरिंग करायचे आहे. माझ्याकडे एवढा पैसा नाही. परंतु वेळप्रसंगी हे घर विकून तिचे स्वप्न पूर्ण करायची तयारी आहे.

Web Title: The Tea Girl Launches 'Good Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.