झोनच्या बाहेर लोड करता येईल टीडीआर
By Admin | Updated: June 10, 2015 03:04 IST2015-06-10T03:04:24+5:302015-06-10T03:04:24+5:30
आरक्षित जमिनीवर ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राईट (टीडीआर) देण्याची प्रथा आहे. यापूर्वी झोन आधारावरच टीडीआर लोड करता येत होता.

झोनच्या बाहेर लोड करता येईल टीडीआर
नागपूर : आरक्षित जमिनीवर ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राईट (टीडीआर) देण्याची प्रथा आहे. यापूर्वी झोन आधारावरच टीडीआर लोड करता येत होता. मात्र, आता टीडीआर जमिनीच्या किमतीच्या(रेडीरेकनर) आधारावर निर्धारित केला जाण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला आपला टीडीआर झोनच्या बाहेरील व्यक्तीला विकायचा असेल तर नवा कायदा अस्तित्वात आल्यावर त्याला तो विकता येणार आहे.
यापूर्वी टीडीआरसाठी शहराची चार झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यात ‘ए’ झोनला नॉन रिसिविंग झोनमध्ये ठेवण्यात आले. या झोनमध्ये इतवारी, महाल यासारख्या दाट वस्त्या येतात. येथे टीडीआर लोड करता येत नाही. ‘बी’ झोनमध्ये रामदासपेठ, बजाजनगर, शिवाजीनगर, लेंड्रापार्क, वाठोडा यासारखे रिंग रोडच्या आत असलेले भाग येतात. ‘सी’झोन अंतर्गत रिंग रोडच्या बाहेरील (मनपा सीमेच्या आतील) भाग येतो. सध्या ‘डी’ झोनचा काही उपयोग होताना दिसत नाही. सध्याच्या नियमानुसार ‘बी’झोनचा टीडीआर ‘बी’ मध्ये येणाऱ्या भागातच लोड केला जाऊ शकतो. यात टीडीआर लोड करणारी व्यक्ती त्याच्या जमिनीच्या किमतीपेक्षा अधिक किंमत घेत होती. मात्र, जेथे टीडीआर लोड होतो तेथे सुविधांची कमतरता आहे. रस्ते रुंद नाहीत. पार्किंगची जागा नाही. नव्या प्रस्तावित नियमानुसार जर वाठोडा येथील टीडीआर रामदासपेठमध्ये लोड करायचा असेल तर रामदासपेठेतील जमिनीच्या किमतीच्या बरोबरीत असलेला टीडीआर करावा लागेल. (प्रतिनिधी)
प्रकरण १ : मौजा चिंचभुवन खसरा नंबर ३१०, ३१४, २७५ ही जमीन रस्त्याच्या डीपी रिझर्व्हेशनमध्ये नसतानाही टीडीआर जारी करण्यात आला. अर्ध्या रस्त्याला नासुप्रने गुंठेवारी अॅक्टअंतर्गत नियमित केले. उर्वरित अर्ध्या रस्त्याचा टीडीआर महापालिकेने एका बिल्डरला दिला.
प्रकरण २ : स्मशान घाटासाठी मौजा हजारी पहाड येथील खसरा नंबर ९० वरील आराजी ४५२६ वर्ग मीटर आरक्षित जमिनीवर १.२५ एफएसआयच्या आधारावर ५६५८ वर्ग मीटर टीडीआर जारी करण्यात आला. जेव्हा की ज्या जागेचा टीडीआर स्मशान घाटाच्या नावार देण्यात आला तो ले-आऊटचा ओपन स्पेस आहे.
प्रकरण ३: मौजा सीताबर्डी येथे रिझर्व्हेशन क्रमांक डब्ल्यू ५५ ही जमीन रस्ता रुंदीकरणात गेली. या जमिनीचा ५५३ वर्ग मीटरचा टीडीआर देण्यात आला. जेव्हा की रस्ता रुंदीकरणासाठी टीडीआर देता येत नाही. नियम तोडून टीडीआर देण्यात आला.