‘टास्क फोर्स’ला रामराम!
By Admin | Updated: August 31, 2016 02:18 IST2016-08-31T02:18:23+5:302016-08-31T02:18:23+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरणे मागील वर्षी ३१ आॅगस्ट रोजी बरखास्त

‘टास्क फोर्स’ला रामराम!
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरणे मागील वर्षी ३१ आॅगस्ट रोजी बरखास्त झाली होती. प्राधिकरणांशिवाय कामकाज चालविणे अवघड असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून वर्षभरासाठी ‘टास्कफोर्स’ स्थापन करण्यात आले होते. परंतु नवा विद्यापीठ कायदा अजूनही लागू न झाल्यामुळे राज्यातील सर्वच विद्यापीठांत ३१ आॅगस्टनंतर नेमके काय करायचे हा संभ्रम आहे. या धर्तीवर नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ‘टास्क फोर्स’ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवा विद्यापीठ कायद्याचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे. मागील वर्षी शासनाच्या निर्देशांनुसार ३१ आॅगस्ट रोजी सर्व विद्यापीठांतील प्राधिकरणे बरखास्त करण्यात आली होती. ३१ आॅगस्टनंतर प्राधिकरण सदस्यांची रिक्त झालेली पदे कोणत्याही पद्धतीने वर्षभर भरण्यात येऊ नयेत, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. विद्यापीठाचे कामकाज प्राधिकरणांशिवाय चालविणे ही कठीण बाब असल्याने विद्यापीठात ‘टास्क फोर्स’ गठित करण्यात आले होते. वर्षभर याच्या मदतीने विद्यापीठाचा कारभार चालला.
परंतु ३१ आॅगस्टनंतर नेमके काय करायचे याबाबत शासनाकडून अद्याप कुठल्याही सूचना आलेल्या नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. आम्हाला शासनाने अद्याप काहीही कळविलेले नाही. त्यामुळे १ सप्टेंबरपासून काय करायचे याबाबत संभ्रम आहे. परंतु मी व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी मिळून ‘टास्क फोर्स’ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले. १ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व कुलगुरुंची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत बैठक आहे. या बैठकीचा ‘अजेंडा’ कुणालाही सांगण्यात आलेला नाही. यात काही सूचना मिळण्याची शक्यता आहे, असे कुलगुरूंनी सांगितले.(प्रतिनिधी)
नव्या ‘टास्क फोर्स’मध्ये नवे चेहरे ?
दरम्यान, नवीन ‘टास्क फोर्स’ बनविण्यात येणार की नाही याबाबतदेखील प्रश्नच आहेच. १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर नेमकी रूपरेषा स्पष्ट होईल. आल्यानंतर नवीन ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नव्या ‘टास्क फोर्स’मध्ये सर्वच जुने सदस्य राहतील, असे नाही. प्रत्येकाची वर्षभरातील कामगिरी, विद्यापीठातील सहभाग या आधारावर विचार करण्यात येईल. नवे सदस्यदेखील सहभागी होऊ शकतात, असे डॉ. काणे यांनी सांगितले. जुन्या ‘टास्क फोर्स’मधील काही सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतलाच नव्हता. त्यांचे काम अजिबात प्रभावी नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली.