म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर तातडीच्या शस्त्रक्रियेचे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:15+5:302021-05-25T04:08:15+5:30
नागपूर : म्युकरमायकोसिसचा रुग्ण गंभीर झाल्यास उपचाराचा खर्चही महागतो व रुग्णांचा जीवही धोक्यात येतो. याची दखल घेत मेयो, मेडिकलसह ...

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर तातडीच्या शस्त्रक्रियेचे लक्ष्य
नागपूर : म्युकरमायकोसिसचा रुग्ण गंभीर झाल्यास उपचाराचा खर्चही महागतो व रुग्णांचा जीवही धोक्यात येतो. याची दखल घेत मेयो, मेडिकलसह शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयांनी ज्या रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज आहे त्या रुग्णावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. परिणामी, मेडिकलमध्ये रोज चार ते पाच, तर मेयो व दंत रुग्णालयात दोन ते तीन शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: अनियंत्रित मधुमेह व स्टेराइडचा अधिक डोस घेणऱ्यांमध्ये हा आजार वाढत आहे. राज्यात पुणेनंतर नागपूर विभागात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या मेडिकलमध्ये आतापर्यंत १५० म्युकरमायकोसिस रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ७७ रुग्ण भरती असून, यातील ५४ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मेयोमध्ये ३९ रुग्णांमधून २०, तर दंत महाविद्यालय व रुग्णालयात ६७ रुग्णांमधून २५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. प्रलंबित शस्त्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सल्ल्याने डॉ. विरल कामदार यांनी मेयो, मेडिकल व दंत रुग्णालयाला विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आवश्यक साधने व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेतला आहे. यामुळे प्रलंबित शस्त्रक्रियेचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
-शस्त्रक्रियेचा ‘झीरो पेंडन्सी’साठी पुढाकार
म्युकरमायकोसिसवरील उपचाराचा खर्च मोठा असल्याने शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वच स्तरातील रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे. हा आजार वेगाने पसरत असल्याने तातडीची शस्त्रक्रिया व औषधोपचारांची गरज असते. म्हणूनच शासकीय रुग्णालयांमध्ये विशेषत: शस्त्रक्रियेचा ‘झीरो पेंडन्सी’साठी पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी लागणारी यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-डॉ. विरल कामदार.