काटोल-नागपूर रोडवरील ताराबोडीत भरदिवसा १६ लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:51 IST2019-06-03T21:50:07+5:302019-06-03T21:51:32+5:30
बँकेतून उचल केलेली रक्कम एटीएममध्ये टाकण्यासाठी जात असलेल्या खासगी एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांना तिघांनी भरदिवसा लुटल्याची घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल-नागपूर रोडवरील ताराबोडी शिवारात सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात लुटारूंनी त्यांच्याकडील १६ लाख रुपये ठेवलेली बॅग हिसकावून घेतली. वृत्त लिहिस्तो लुटारूंचा सुगावा लागला नव्हता.

काटोल-नागपूर रोडवरील ताराबोडीत भरदिवसा १६ लाख लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (काटोल ) : बँकेतून उचल केलेली रक्कम एटीएममध्ये टाकण्यासाठी जात असलेल्या खासगी एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांना तिघांनी भरदिवसा लुटल्याची घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल-नागपूर रोडवरील ताराबोडी शिवारात सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात लुटारूंनी त्यांच्याकडील १६ लाख रुपये ठेवलेली बॅग हिसकावून घेतली. वृत्त लिहिस्तो लुटारूंचा सुगावा लागला नव्हता.
धनराज गुलाबराव चरपे (४०) व अनुप रामकृष्ण वनकर (३२) दोघेही रा. येनवा, ता. काटोल हे ‘लॉजीकॅश’ नामक एजन्सीचे कर्मचारी असून, ते काटोल शहर व परिसरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये रक्कम टाकण्याचे काम करतात. या दोघांनी सोमवारी सकाळी भारतीय स्टेट बँकेच्या काटोल शाखेतून नेहमीप्रमाणे ५१ लाख रुपयांची उचल केली आणि ती रक्कम बॅगमध्ये घेऊन त्यांच्या एमएच-४०/एबी-३८८६ क्रमांकाच्या मोटरसायकलने निघाले. सुरुवातीला त्यांनी काटोल शहरातील गळपुरा येथे असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये २२ लाख रुपये टाकले आणि मेटपांजऱ्याच्या दिशेने निघाले.
त्यांनी मेटपांजरा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये १३ लाख रुपयांचा भरणा केला आणि उर्वरित १६ लाख रुपये घेऊन कोहळी (ता. कळमेश्वर) शिवारातील भागीरथ टेक्सटाईलजवळील एटीएममध्ये भरण्यासाठी निघाले. दोघेही ताराबोडी शिवारात पोहोचताच मागून (काटोलहून) मोटरसायकलने आलेल्या तिघांनी त्यांच्या मोटरसायकलला धक्का दिला. चालकाचा ताबा सुटल्याने दोघेही खाली कोसळले. त्यातच मोटरसायकलवरील एकाने त्यांच्याजवळील रकमेची बॅग हिसकावून घेतली तर दुसºयाने लगेच त्याची मोटरसायकल वळविली. त्यानंतर तिघेही मोटरसायकलने काटोलच्या दिशेने पळून गेले.
दरम्यान, दोघांनीही काटोल पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. दुसरीकडे, पोलिसांनी नाकाबंदी करून तपासाला सुरुवात केली. यात पोलिसांनी या मार्गावरील काटोल शहरालगतच्या टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र, लुटारू कुठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे ते या दोघांच्या मागावर असून, मेंढेपठार मार्गाने पळून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. शिवाय, फिर्यादीकडून संपूर्ण हकीकत जाणून घेतली. याप्रकरणी काटोल पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि ३९४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.