तामिळनाडू एक्स्प्रेस, पार्सल कार्यालयात बॉम्बची अफवा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:07 IST2020-12-06T04:07:45+5:302020-12-06T04:07:45+5:30
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण : पार्सल कार्यालयात झाली मॉक ड्रील नागपूर : ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यात घातपाताची शंका असल्यामुळे लोहमार्ग ...

तामिळनाडू एक्स्प्रेस, पार्सल कार्यालयात बॉम्बची अफवा ()
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण : पार्सल कार्यालयात झाली मॉक ड्रील
नागपूर : ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यात घातपाताची शंका असल्यामुळे लोहमार्ग पोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक सक्रिय झाले आहे. दुपारी तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये बेवारस बॅगमध्ये घातपाताची वस्तू असू शकते, असा निरोप पथकाला मिळाला. कारवाईनंतर ही बॅग ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर दुपारी ३ वाजता पथकाला पार्सल कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. लगेच पथक पार्सल कार्यालयात पोहोचले. परंतु कारवाईनंतर ही मॉक ड्रील असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
लोहमार्ग पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाला रेल्वेगाडी क्रमांक ०२६२१ तामिळनाडू-नवी दिल्ली विशेष रेल्वेगाडीत एक बेवारस बॅग असल्याची सूचना मिळाली. यामुळे या गाडीतील प्रवासी घाबरले. त्यांनी लोहमार्ग पोलिसांना याची सूचना दिली. ६ डिसेंबरमुळे लोहमार्ग पोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक रेल्वेस्थानक परिसरातच पाहणी करीत होते. सूचना मिळताच दुपारी २ वाजता पथक प्लॅटफाॅर्म क्रमांक १ वर पोहोचले. तामिळनाडू एक्स्प्रेसच्या एस ३ कोचमध्ये हा बेवारस बॉक्स ठेवून होता. श्वानाने बॅगमध्ये आक्षेपार्ह वस्तू असल्याचा इशारा दिला. त्यानंतर शहर पोलिसांच्या बीडीडीएस पथकाच्या साह्याने बॉक्स ताब्यात घेण्यात आला. हा बॉक्स शहर पोलिसांनी मोकळ्या जागेत नेऊन नष्ट केला. त्यात इलेक्ट्रिकचे सॉकेट असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने दिली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, राहुल गवई, ऋषिकांत राखुंडे, लीना आष्टनकर, राहुल सेलोटे, सौरभ यादव यांनी पार पाडली.
..........
पार्सल कार्यालयात मॉक ड्रील
दुपारी ३ वाजता लोहमार्ग पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पार्सल कार्यालयात बॉम्ब असल्याची सूचना मिळाली. लगेच पथक पार्सल कार्यालयात पोहोचले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना बाजूला केले. बॉम्बच्या अफवेमुळे पार्सल कार्यालयात खळबळ उडाली. परंतु कारवाईनंतर ही मॉक ड्रील असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
..........