तांबोळी नागपुरचे पोलीस सहआयुक्त, तर हसन भंडाऱ्याचे अधीक्षक
By योगेश पांडे | Updated: August 22, 2024 22:26 IST2024-08-22T22:26:06+5:302024-08-22T22:26:06+5:30
नागपूरच्या सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांची मुंबईत बदली झाली होती. मात्र त्यांच्या जागी कुणालाच नियुक्ती न देण्यात आल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते.

तांबोळी नागपुरचे पोलीस सहआयुक्त, तर हसन भंडाऱ्याचे अधीक्षक
नागपूर : राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त निसार तांबोळी यांची नागपूरच्या पोलिस सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर काही दिवसांअगोदर वर्ध्यातून बदली देण्यात आलेले नुरूल हसन यांच्याकडे भंडाऱ्याच्या अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गृह विभागातर्फे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी गुरुवारी जारी करण्यात आली.
नागपूरच्या सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांची मुंबईत बदली झाली होती. मात्र त्यांच्या जागी कुणालाच नियुक्ती न देण्यात आल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. आता तांबोळी यांची या पदावर बदली झाली आहे. भंडाऱ्याचे अधीक्षक लोहित मतानी यांची मुंबईत सहायक पोलिस महानिरीक्षकपदी (कायदा व सुव्यवस्था) बदली करण्यात आली आहे. हे पद रिक्त होते. तर मतानी यांच्या जागेवर हसन भंडाऱ्याचे नवे अधीक्षक असतील. हसन हे अगोदर वर्धा येथे अधीक्षक होते. १३ ऑगस्ट रोजी त्यांची नवी मुंबईत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ११ चे समादेशक म्हणून बदली झाली होती.
हसन व मतानी हे दोघेही नागपुरला पोलीस उपायुक्तदेखील होते. याशिवाय नंदुरबारचे अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची १३ ऑगस्ट रोजी नागपुरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून बदली झाली होती. त्यांना आता नागपुरात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.