बोलणी फिस्कटली, मोर्चा अडला
By Admin | Updated: December 16, 2015 03:26 IST2015-12-16T03:26:10+5:302015-12-16T03:26:10+5:30
शासनकर्त्यांनी लेखी आश्वासन देऊनही संगणक परिचालकांच्या मागण्या वर्षोनुवर्ष प्रलंबित राहिल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक ...

बोलणी फिस्कटली, मोर्चा अडला
संगणक परिचालक : टेकडी रोडवर ठिय्या, तिघांना घेतले ताब्यात
नागपूर : शासनकर्त्यांनी लेखी आश्वासन देऊनही संगणक परिचालकांच्या मागण्या वर्षोनुवर्ष प्रलंबित राहिल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या २० हजार संगणक परिचालकांनी विधानभवनावर विराट मोर्चा काढला. टेकडी मार्गावरील त्यांच्या मोर्चाला दिवसभर एकाही मंत्र्याने भेट न दिल्यामुळे मोर्चेकरी चांगलेच संतप्त झाले. यात काही जणांनी गोंधळ घालण्याचा आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा मंत्र्यांसोबत वाटाघाटी फिस्कटल्यामुळे मोर्चेकऱ्यांनी मोर्चा मुक्कामी ठेवण्याचा निर्णय घेतला.
संग्राम प्रकल्पातील संगणक परिचालकांना पदनिश्चित करून शासनसेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने अनेकदा शासनदरबारी पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी संघटनेला लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे १५ डिसेंबरला संगणक परिचालकांनी विधानभवनावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. २० हजारावर संगणक परिचालकांचा विराट मोर्चा विधानभवनावर धडकला. पोलिसांनी टेकडी मार्गावर मोर्चा अडवून धरला. संगणक परिचालकांच्या संग्राम प्रकल्पाची मुदत ३१ डिसेंबर २०१५ रोजी संपणार आहे. त्याबाबत महाआॅनलाईन कंपनीने सर्व संगणक परिचालकांना अंतिम नोटीस देऊन ३१ डिसेंबर २०१५ पासून महाआॅनलाईन कंपनीशी त्यांचा काहीच संबंध नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे संघटनेने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन केले. दिवसभर उन्हात मोर्चेकऱ्यांनी ठाण मांडून शासनविरोधी घोषणाबाजी केली. परंतु दिवसभर एकाही मंत्र्याने मोर्चाला भेट दिली नाही. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास मोर्चेकरी संतप्त झाले होते. सायंकाळी ७ वाजता मोर्चातील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. परंतु संघटनेसोबत त्यांची बोलणी फिस्कटली. त्यामुळे ३४ जिल्ह्यातील संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी बैठक घेऊन मोर्चा कायम ठेवण्याचा निर्धार केला.