अतिक्रमणांच्या विरोधात धडक कारवाई करा : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 23:06 IST2021-06-25T23:05:32+5:302021-06-25T23:06:14+5:30
नागपूर, ता. २५ : शहरातील रस्ते आणि नदीलगत चारचाकी व दुचाकी वाहने दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांमार्फत मोठ्या प्रमाणात ...

अतिक्रमणांच्या विरोधात धडक कारवाई करा : महापौर
नागपूर, ता. २५ : शहरातील रस्ते आणि नदीलगत चारचाकी व दुचाकी वाहने दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांमार्फत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात असून महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाने संयुक्तरित्या धडक कारवाई सुरू करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
बैद्यनाथ चौक ते जगनाडे चौकापर्यंत जुन्या दुचाकी व चारचाकी वाहन विक्रीची दुकाने असून येथील व्यावसायिक रस्त्यावर अतिक्रमण करीत असल्याची तक्रार नगरसेवकांनी सभागृहात केली होती. त्याची दखल घेऊन महापौरांनी पोलीस विभागासोबत शुक्रवारी मनपा मुख्यालयात विशेष बैठक आयोजित केली. बैठकीला सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक साखरे, संजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत जाधव, प्रादेशिक परिवहन विभागाचे मार्तंड नेवसकर, मनपाचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अशोक पाटील, गणेश राठोड, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील आदी उपस्थित होते.
महापौरांनी दहाही झोनमधील अतिक्रमणांचे सर्वेक्षण करून वाहतूक पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटविण्याचे निर्देश देऊन रस्त्यावरील वाहने जप्त करण्याकरिता टोईंग व्हॅन विकत घेईपर्यंत ती भाड्याने घेण्याची सूचना केली. सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी मनपा व पोलिसांमध्ये समन्वय राखण्याचे तसेच विरोधी पक्षनेता तानाजी वनवे यांनी रस्त्यावर जनरेटर लावून सामान विकणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात कारवाईचे निर्देश दिले.