निवडणुकीचे अखेरचे तीन टप्पे एक-दोन दिवसातच घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST2021-04-20T04:07:54+5:302021-04-20T04:07:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाकुलिआ (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगाल निवडणुकीचे अखेरचे तीन टप्पे शिल्लक आहेत. या टप्प्यांसाठी नियोजित वेळापत्रकात ...

निवडणुकीचे अखेरचे तीन टप्पे एक-दोन दिवसातच घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चाकुलिआ (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगाल निवडणुकीचे अखेरचे तीन टप्पे शिल्लक आहेत. या टप्प्यांसाठी नियोजित वेळापत्रकात बदल करून एक किंवा दोन दिवसात सगळीकडील मतदान घ्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. वेळापत्रकात बदल करण्यासाठी मी आयोगापुढे हात जोडते, असे प्रतिपादनही ममता यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत सातत्याने निवडणूक आयोगाविरोधात भूमिका घेणाऱ्या ममता यांचा सूर कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे बदलला आहे. उत्तर दिनाजपूर येथे आयोजित प्रचारसभेदरम्यान त्या बोलत होत्या.
राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, मतदान एक किंवा जास्तीत जास्त दोन दिवसात आटोपते घेणे योग्य ठरेल. यामुळे वाढत्या संसर्गावर आळा येऊ शकतो. मात्र, उर्वरित तीन टप्पे एकत्रित घेण्याबद्दल दबावामुळे आयोग नकार देऊ शकतो, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. आयोगाने स्वतः निर्णय घ्यावे. भाजप काय म्हणत आहे त्यावर आयोगाने भूमिका ठरवू नये. मतदानाचा एक दिवस जरी वाचला तरी जनतेचे आरोग्य वाचविले जाऊ शकते, असे बॅनर्जी म्हणाल्या.
यानंतर मी किंवा पक्षाचे इतर नेते दाटीवाटीच्या भागात एकही प्रचारसभा घेणार नाहीत. मागील सहा महिन्यांत केंद्र शासनाने कुठलेही नियोजन केले नाही, असा आरोपही त्यांनी केला.