कार घेताय, आधी दोन झाडे लावा
By Admin | Updated: June 2, 2017 02:23 IST2017-06-02T02:23:54+5:302017-06-02T02:23:54+5:30
आता कार विकत घेण्यासोबतच दोन झाडे लावण्याची सूचना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) करणार आहे.

कार घेताय, आधी दोन झाडे लावा
शहर आरटीओचा निर्णय : झाडाच्या फोटोसह द्यावी लागणार माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आता कार विकत घेण्यासोबतच दोन झाडे लावण्याची सूचना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) करणार आहे. नागपूर शहर आरटीओ कार्यालयाने नुकताच हा निर्णय घेतला असून यात विविध वाहन संघटनांचीही मदत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, वाहन मालकाला झाडांच्या छायाचित्रासह जागेची माहितीही द्यावी लागणार आहे. मात्र, हे बंधनकारक नाही. पर्यावरणासाठी माझाही पुढाकार या भावनेतून ही मोहीम राबवली जाणार आहे.
राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा प्रबंधक संस्थेची नुकतीच बैठक पार पडली. यात वनमहोत्सवांतर्गत चार कोटी वृक्ष लावण्यावर चर्चा झाली. बैठकीत बस, ट्रक, टॅक्सी चालक/ संघटनांनी भरीव मदत करण्याचे आश्वासन आरटीओ कार्यालयाला दिले. सोबतच बस किंवा ट्रक या एका वाहनाकरिता चार वृक्ष, मध्यम दर्जाचे बस किंवा ट्रक टॅक्सी करिता तीन वृक्ष, कार व हलक्या वाहनांकरिता दोन वृक्ष तर आॅटोरिक्षासाठी एक वृक्ष लावण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहन घेतल्यानंतर वाहनाच्या पासिंगच्यावेळी वाहन मालकाला झाड लावलेल्याचा फोटो व जागेची माहिती द्यावी लागणार आहे. हे बंधनकारक नसले तरी वैयक्तिक जबाबदारीतून ही मोहीम राबविली जाणार आहे. हवामान, पाण्याची उपलब्धता व भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन आंबा, चिंच, आवळा, कवठ, फणस, वड, पिंपळ, कडूनिंब, क्यॅशिया, रेन ट्री, गुलमोहर व चाफा आदी वृक्षांची लागवड करावी, अशाही सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रद जिचकार यांनी दिल्या.