कितीही कारवाई करा; राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल आणि व्याजासकट अद्दल घडवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 22:25 IST2021-11-17T22:24:19+5:302021-11-17T22:25:23+5:30
Nagpur News कितीही कारवाई करा, सामान्य जनता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल आणि व्याजासकट अद्दल घडवेल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे केंद्र सरकार व भाजपला दिला.

कितीही कारवाई करा; राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल आणि व्याजासकट अद्दल घडवेल
नागपूर : एखाद्या राज्यात सत्ता न मिळाल्यास केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. राज्यातील सत्ता उलथवण्यासाठी केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत आहे. केंद्रातील एजन्सींच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास दिला जात आहे. परंतु कितीही कारवाई करा, सामान्य जनता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल आणि व्याजासकट अद्दल घडवेल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे केंद्र सरकार व भाजपला दिला.
शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. बुधवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वर्धमाननगरातील वचन लॉन येथे कार्यकर्त्यांच्या स्नेहमिलन समारंभात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल प्रामुख्याने उपस्थित होते
शरद पवार म्हणालेस, 'मी नागपुरात आलो आहे आणि अनिल देशमुख येथे नाहीत, असं प्रथमच घडलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्याने भाजपची मंडळी अस्वस्थ झाली असून सत्ता मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या मागे वेगवेगळ्या एजन्सीज लावण्यात आल्या आहेत. एकनाथ खडसे, हसन मुश्रीफ, संजय राऊत, अजित पवार यांच्या कुटुंबांना त्रास दिला जात आहे. अनिल देशमुख यांची अटकही त्यातूनच झाली आहे. देशमुखांना तुम्ही तुरुंगात टाकलं असलं तरी तुरुंगातील त्यांच्या प्रत्येक दिवसाची, प्रत्येक तासाची किंमत जनता तुमच्याकडून वसूल करणार आहे', असा इशाराच पवार यांनी यावेळी दिला.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना नागपुरात संघटना मजबूत करण्याच्या सूचना देत नागपुरात राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचे आवाहनही केले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार राजेंद्र जैन, पक्षाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, प्रवीण कुंटे पाटील, ईश्वर बाळबुधे, आभा पांडे, बाबागुजर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शरद अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केले.
अनिल देशमुख लवकरच बाहेर येणार- पटेल
यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार यांचे आशीर्वाद अनिल देशमुख यांच्यासोबत आहेत आणि पवारांच्या आशीर्वादाने देशमुख लवकरच तुरुगांबाहेर येतील. हे माझे मत नाही तर शरद पवार यांचे मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.