सरकारी जमिनी लेआउट टाकून विकणाऱ्यांवर कारवाई करा; सुनील केदार यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 21:15 IST2021-09-09T21:15:20+5:302021-09-09T21:15:49+5:30
Nagpur News नागपूर शहराबाहेर नागपूर सुधार प्रन्यास व अन्य शासकीय संस्थांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या जमिनीवर बेकायदा लेआउट टाकून गरीब नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले.

सरकारी जमिनी लेआउट टाकून विकणाऱ्यांवर कारवाई करा; सुनील केदार यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराबाहेर नागपूर सुधार प्रन्यास व अन्य शासकीय संस्थांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या जमिनीवर बेकायदा लेआउट टाकून गरीब नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले. (Take action against those who sell government land layouts; Directed by Sunil Kedar)
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गुरुवारी या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. तीत जिल्हाधिकारी विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त अविनाश कातडे, निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर, जि.प. सदस्य अवांतिका लेकुरवाळे यांच्यासह फसवणूक झालेले प्लॉटधारक उपस्थित होते.
यावेळी केदार यांनी कोणत्याही परिस्थितीत तरोडी (खु) येथील गरीब व अन्यायग्रस्त नागरिकांचे नुकसान होणार नाही, याबद्दल आश्वस्त केले. या संदर्भात तोडगा काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सोबतच यानंतर कोणतेही अतिक्रमण या भागात होऊ नये, यासाठी संबंधित संस्थांनी नियमित प्रयत्न करावे, असेही सांगितले.
महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूर महापालिकाद्वारे राष्ट्रीय क्रीडा केंद्र व प्रशिक्षण संस्थेला ही जागा देण्यात आली असून या जागेच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तथापि, यासंदर्भात पुढील आठ दिवसात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, त्यानंतरच संरक्षण भिंतीचे काम सुरू करा, असे केदार यांनी यावेळी जाहीर केले.