शुल्कासाठी अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:24+5:302021-05-25T04:08:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिंक कंबरडे मोडले असून, अनेकांनी महाविद्यालयांचे पूर्ण शैक्षणिक शुल्क भरलेले ...

शुल्कासाठी अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिंक कंबरडे मोडले असून, अनेकांनी महाविद्यालयांचे पूर्ण शैक्षणिक शुल्क भरलेले नाही. विद्यार्थ्यांची स्थिती समजून न घेता काही महाविद्यालये महाविद्यालय शुल्कासाठी त्यांची अडवणूक करीत आहेत. शुल्क भरल्यावरच परीक्षा अर्ज भरण्यात येईल, असे विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे. अशा महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सिनेट सदस्यांनी केली आहे. यासंदर्भात शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क, महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र, अशा काळातही काही महाविद्यालये ही परीक्षा शुल्काच्या आड विद्यार्थ्यांकडून इतर शुल्कही जमा करीत आहेत. मार्च २०२० पासून महाविद्यालय बंद असल्याने ग्रंथालय, संगणक, आदी गोष्टींचा विद्यार्थ्यांनी वापरही केलेला नाही. तरीदेखील महाविद्यालयांकडून त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात येत आहे. या महाविद्यालयांविरोधातील तक्रारी आल्यानंतर सिनेट सदस्यांनी सोमवारी प्र-कुलगुरूंची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.
आर्थिक स्थिती बिकट असल्याने विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शुल्क भरण्याची मुभा देण्यात यावी व परीक्षा अर्ज स्वीकारावे, अशी सदस्यांनी मागणी केली. यावेळी विष्णू चांगदे, समय बन्सोड, टारजन गायकवाड, वामन तूर्के, समीर पराते प्रामुख्याने उपस्थित होते.
महाविद्यालयीन शुल्क माफ करावे
कोरोना संसर्गाने थेट प्रभावित झालेले बरेच विद्यार्थी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शुल्क माफ करावे व त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.