अभिनाश कुमार यांच्यावर कारवाई करा
By Admin | Updated: June 15, 2016 03:14 IST2016-06-15T03:14:46+5:302016-06-15T03:14:46+5:30
कर्तव्यावर असलेल्या महिला छायाचित्रकाराचा कॅमेरा हिसकावून त्यांच्याशी असभ्य वर्तन करणारे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्यावर कारवाई करून

अभिनाश कुमार यांच्यावर कारवाई करा
महिला छायाचित्रकाराशी असभ्य वर्तन :
पत्रकार संघाची पोलीस आयुक्तांना मागणी
नागपूर : कर्तव्यावर असलेल्या महिला छायाचित्रकाराचा कॅमेरा हिसकावून त्यांच्याशी असभ्य वर्तन करणारे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्यावर कारवाई करून पुन्हा असा प्रकार घडणार नाही यासंबंधी दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, नागपूर श्रमिक पत्रकार संघ तसेच प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने करण्यात आली. यासंबंधाने मंगळवारी दुपारी पत्रकारांचे एक शिष्टमंडळ पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांना भेटले.
एका प्रतिष्ठित दैनिकाच्या छायाचित्रकार मोनिका चतुर्वेदी या सोमवारी दुपारी जरीपटक्यातील लाठीमार आणिं तणावाच्या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडत असताना पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी तिला विरोध केला. मोनिकाचा कॅमेरा हिसकावून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. ते पाहून दुसऱ्या एका पोलिसाने दुसऱ्या दैनिकातील एका छायाचित्रकाराची कॉलर पकडली. तिसऱ्याने शिवीगाळ केली. हा सर्व संतापजनक प्रकार अन्य एका छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. तो सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली. पत्रकारजगतातूनच नव्हे तर विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी आणि मान्यवरांनी अभिनाश कुमार यांच्या या कृतीचा निषेध नोंदवून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनाही सोमवारीच या घटनेची माहिती देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी पोलीस आयुक्त यादव यांची भेट घेऊन उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या वर्तणुकीचे किस्से त्यांना सांगितले. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली.
पीडित छायाचित्रकार मोनिका चतुर्वेदी हिनेही झालेली घटना सांगितली. आयुक्तांनी यावेळी बोलताना झालेली घटना अतिशय खेदजनक असल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा असा प्रकार घडणार नाही याबाबत योग्य उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, एनयूडब्ल्यूजेचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, महासचिव शिरीष बोरकर, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव, प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश टिकले, ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव, राजेश तिवारी, हरीश तिवारी यांच्यासह अनेक पत्रकार आणि छायाचित्रकार उपस्थित होते. (प्रतिनिधी)