५०० रुपये घ्या अन् व्यवसाय करा !
By Admin | Updated: February 12, 2015 02:11 IST2015-02-12T02:11:20+5:302015-02-12T02:11:20+5:30
आजच्या काळात ५०० रुपयात पिशवीभर भाजीपालासुद्धा येत नाही. परंतु शासन मात्र ५०० रुपयात स्वत:चा व्यवसाय करता येऊ शकतो, यावर आजही ठाम आहे. होय, ...

५०० रुपये घ्या अन् व्यवसाय करा !
लोकमत विशेष
आनंद डेकाटे नागपूर
आजच्या काळात ५०० रुपयात पिशवीभर भाजीपालासुद्धा येत नाही. परंतु शासन मात्र ५०० रुपयात स्वत:चा व्यवसाय करता येऊ शकतो, यावर आजही ठाम आहे. होय, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार योजनेखाली महिलांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले जाते ३० वर्षांपूर्वी मिळणारे ५०० रुपयाचे अनुदान आजही तितकेच असून, त्यात एक रुपयाचीही वाढ झाली नाही. परिणामी या योजनेसाठी अर्ज करणेच बंद झाले असून योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महिलांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे विविध योजना राबविलेल्या जातात. यात सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे स्वयंरोजगाराची योजना होय. या योजनेंतर्गत महिलांना व्यक्तिगत अनुदान दिले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना खाद्यपदार्थ तयार करून विकणे, मण्यांच्या वस्तू विकणे, भाजीपाला व फळे विकणे आदी व्यवसाय करण्यासाठी मदत म्हणून शासनातर्फे ५०० रुपये अनुदान दिले जाते.
अनुदान वाढीची मागणी शासन दरबारी पडून
महिलांच्या स्वयंरोजगारासाठी देण्यात येणारे ५०० रुपयांचे अनुदान हे १९८५ च्या निकषानुसार आहेत. ३० वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळे आज ५०० रुपयात व्यवसाय करणे शक्य नाही. त्यामुळे यासंदर्भातील निकष बदलून अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस महिला व बाल विकास विभागातर्फे राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु शासनाने यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही.