राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ताजाबाद
By Admin | Updated: November 8, 2015 03:08 IST2015-11-08T03:08:12+5:302015-11-08T03:08:12+5:30
हजरत बाबा ताजुद्दीन या महान संताच्या वास्तव्याने नागपूरनगरी पावन झाली आहे़ ताजुद्दीन बाबा मुस्लीम धर्माचे असले तरी ...

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ताजाबाद
मंगेश व्यवहारे नागपूर
हजरत बाबा ताजुद्दीन या महान संताच्या वास्तव्याने नागपूरनगरी पावन झाली आहे़ ताजुद्दीन बाबा मुस्लीम धर्माचे असले तरी त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारा भाविक हा सर्व धर्माचा आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले ताजाबाद शरीफ या तीर्थस्थळात आजही बाबांची शिकवण जोपासली जात आहे. ताजाबादच्या देखभालीसाठी बनविण्यात आलेल्या हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्येही सर्व धर्मीयांचा समावेश दिसतो. भाविकांना नैतिक व आध्यात्मिक ऊर्जा पुरविणाऱ्या या स्थळाची कीर्ती जगभर पसरली आहे आणि म्हणूनच बाबांना मानणारा त्यांचा भक्त समुदाय जगाच्या कानाकोपऱ्यातून ताजाबाद येथे येतो आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होतो़ शहरात मोठ्या ताजाबादपासून तर छोट्या ताजाबादपर्यंत, ग्रामीण भागात कामठीपासून वाकीपर्यंत सर्वत्र बाबांची कीर्ती दुमदुमत असते़
ताजुद्दीन बाबांचा जन्म नागपूरजवळच्या कामठी येथे झाला़ कामठीतीलच एका मदरशात बाबांनी शिक्षण घेतले. बाबांना नेहमी एकांत प्रिय असायचा़ या एकांतात ते अल्लाहची आराधना करायचे व समग्र विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करायचे़ बाबांनी सेनेतही नोकरी केली. परंतु सत्कर्मासाठी मला थेट देवाने पाठविले आहे, असे सेना अधिकाऱ्याला सांगून एक साधा कपडा अंगाला लपेटून ते पुन्हा आराधनेत मग्न झाले़
पुढे वेगवेगळ्या माध्यमातून बाबांचा साक्षात्कार भाविकांना झाला. ताजुद्दीन बाबांना मानणारा भाविक हा कुठल्याही एका जाती वा धर्माचा नाही़ सर्व जाती, पंथ, संप्रदायात बाबांचे अनुयायी आहेत़ त्याचे कारण बाबांनी दिलेली एकात्मतेची शिकवण आहे़ बाबा जन्माने मुस्लीम होते़ परंतु त्यांच्या दरबारात येणाऱ्या कुठल्याही भक्ताला त्यांनी कधी त्याची जात विचारली नाही़ जो कोणती समस्या घेऊन तो भाविक यायचा ती समस्या कशी सोडवता येईल, याचाच विचार बाबा करायचे़
हे करताना त्यांनी कधी आपला धर्म कुणावर लादला, असे अजिबात झाले नाही़ भाविकाच्या धर्माचा पूर्ण सन्मान बाळगून बाबांनी त्याच्या समस्येचे निराकरण केले़ म्हणूनच आज बाबांच्या सर्व दरबारात सर्व समाजाचे भाविक मोठ्या विश्वासाने माथा टेकवत असतात़
बाबांच्या ताजाबाद येथील दर्ग्याची वाटचाल आजही बाबांच्या विचारांवर सुरू आहे. या दर्ग्याचे संचालन करण्यासाठी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट क ार्यरत आहे. ट्रस्टमध्ये सर्व धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व दिले आहे.
ट्रस्टचे क ोषाध्यक्ष ख्रिश्चन समाजाचे आहेत. मोहब्बतसिंग तुली या ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून राहिले आहे. माजी मंत्री अनिस अहमद या संस्थेचे अध्यक्ष असताना सरदार हरमेंदरसिंग अहलुवालिया हे सचिव तर रमेश पवार हे क ोषाध्यक्ष राहिले आहेत. बाबांचा ताजाबादच नाही तर वाकी, सक्करदरा येथेही दर्ग्याचे संचालन हिंदू समाजाकडून होत आहे.