महामार्गांच्या बांधकामांमध्ये ‘सिंथेटिक फायबर’ वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:45 IST2021-02-05T04:45:01+5:302021-02-05T04:45:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्टील आणि सिमेंटच्या किमती वाढत असल्याने महामार्गांच्या प्रकल्पाचा खर्च वाढीस लागतो. त्यामुळेच यानंतर महामार्ग ...

Synthetic fiber will be used in the construction of highways | महामार्गांच्या बांधकामांमध्ये ‘सिंथेटिक फायबर’ वापरणार

महामार्गांच्या बांधकामांमध्ये ‘सिंथेटिक फायबर’ वापरणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्टील आणि सिमेंटच्या किमती वाढत असल्याने महामार्गांच्या प्रकल्पाचा खर्च वाढीस लागतो. त्यामुळेच यानंतर महामार्ग व पुलांच्या बांधकामांमध्ये ‘सिंथेटिक फायबर’चा वापर करण्यात येईल. त्याचप्रमाणे खर्चात बचत करण्यासाठी प्लास्टिकसह रबर, ज्यूटचादेखील वापर होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. एका संस्थेच्या कार्यक्रमादरम्यान ते ‘ऑनलाईन’ माध्यमातून बोलत होते.

देशातील ४० टक्के स्टील आणि सिमेंट आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विकत घेण्यात येते. जुन्या स्टीलवर पुन्हा प्रक्रिया करून त्याचा वापर केल्यानेदेखील खर्चात बचत होऊ शकते. बांधकामासाठी वापरण्यात येणारे जेसीबी ‘बायो सीएनजी’वर चालवून इंधनाचा खर्च वाचविला जाऊ शकतो, असे गडकरी यांनी सांगितले. येत्या ३१ मार्चपर्यंत ११ हजार कोटींची कामे करण्याचे तसेच दररोज ४० किमी रस्तेबांधणी व्हावी, या गतीने कामे करण्याचे प्रयत्न आहेत. रस्ते बांधणीच्या क्षेत्रात परकीय गुंतवणूक करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दरवर्षी पथकराचे उत्पन्न ८ ते १० टक्क्यांनी वाढत असून, २०२५ पर्यंत पथकरातून एनएचएआयला १.३५ लाख कोटींचे उत्पन्न मिळावे, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्टर पाईपलाईन’मध्ये ऊर्जाक्षेत्रासाठी २५ लाख कोटी, रस्त्यांसाठी २० लाख कोटी, सिंचन, ग्रामीण कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १६ लाख कोटी, रेल्वेवर १४ लाख कोटी, डिजिटल पायाभूत सुविधांसाठी ३.२ लाख कोटी, विमानतळ आणि बंदरांच्या विकासासाठी अडीच लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. रस्ते विकासात २५ लाख कोटींची कामे होणार आहेत, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Synthetic fiber will be used in the construction of highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.