शोभायात्रेत स्वाईन फ्लूवर प्रबोधन
By Admin | Updated: March 26, 2015 02:26 IST2015-03-26T02:26:02+5:302015-03-26T02:26:02+5:30
महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्वाईन फ्लूला आळा घालण्यात अपयश आले असून प्रशासनही हतबल झाले आहे. त्यामुळे आता प्रभू रामचंद्राचा आधार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शोभायात्रेत स्वाईन फ्लूवर प्रबोधन
नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्वाईन फ्लूला आळा घालण्यात अपयश आले असून प्रशासनही हतबल झाले आहे. त्यामुळे आता प्रभू रामचंद्राचा आधार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रामनवमीला निघणाऱ्या शोभायात्रेच्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी मनपाचा स्वाईन फ्लूवर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी बुधवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रामनवमी शोभायात्रा विचारात घेता, स्वाईन फ्लू व डेंग्यूला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जनजागृतीसाठी शहरात फिरणारा स्वाईन फ्लू चित्ररथ शोभायात्रेत सहभागी होत आहे. यासाठी तयारी करण्यात आली आहे. सोबतच शोभायात्रेदरम्यान जनजागृती करण्यासाठी प्रचार साहित्याचे वाटप केले जाणार आहे. शोभायात्रेत भाविक आजारी पडल्यास त्याला तात्काळ उपचार उपलब्ध व्हावे ,यासाठी अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. शोभायात्रेत सर्व जातीधर्माचे लोक सहभागी होतात. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या जनजागृतीसाठी चित्ररथाची मदत घेणार आहे. पोद्दारेश्वर राममंदिरासोबतच रामनगर राममंदिरातून निघाणाऱ्या शोभायात्रेतही असाच चित्ररथ सहभागी केला जाणार असल्याची माहिती सिंगारे यांनी दिली. विभागाच्या बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, डॉ.श्याम शेंडे यांच्यासह झोनचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)