‘स्वाईन फ्लू’: मेडिकल उदासीन
By Admin | Updated: July 22, 2014 00:53 IST2014-07-22T00:53:40+5:302014-07-22T00:53:40+5:30
मेडिकलच्या अतिदक्षता विभागात भरती असलेल्या स्वाईन फ्लू संशयित महिलेचा शनिवारी मृत्यू झाला, तिचे नमुने त्याच दिवशी घेण्यात आले. परंतु दोन दिवस उलटूनही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले

‘स्वाईन फ्लू’: मेडिकल उदासीन
मृत्यूनंतरही संशयिताचे नमुने तपासणीपासून दूर
नागपूर : मेडिकलच्या अतिदक्षता विभागात भरती असलेल्या स्वाईन फ्लू संशयित महिलेचा शनिवारी मृत्यू झाला, तिचे नमुने त्याच दिवशी घेण्यात आले. परंतु दोन दिवस उलटूनही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
उपराजधानीत स्वाईन फ्लूची सुरुवात २००९ पासून झाली. पहिल्याच वर्षी ४५ रुग्णांचा बळी गेला. २०१० मध्ये ५४, २०११ मध्ये ५ तर २०१२ मध्ये १५ रुग्णांचा मृत्यू झाला. मेडिकल प्रशासनाने स्वाईन फ्लू रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केला. प्रभावी औषध आणि तत्काळ दखल घेण्यात येत असल्याने रुग्ण बरे होऊ लागले. मागील दोन वर्षांत स्वाईन फ्लूचे १० वर रुग्ण नाहीत. असे असतानाही स्वाईन फ्लूला घेऊन आरोग्य विभागाचे अतिदक्षतेचे आदेश आहेत. परंतु मेडिकल प्रशासन याला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे.
शनिवार १९ जुलै रोजी मेडिकलच्या अतिदक्षता विभागामध्ये सुषमा मिश्रा (३८) हिला स्वाईन फ्लू संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. परंतु रात्री ११.३० वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिच्या मृत्युपूर्वी नमुने घेतले होते. हे नमुने मेडिकलच्या मायक्रोबॉयोलॉजी प्रयोगशाळेकडे सुपूर्द केले.
येथून ते तपासणीसाठी मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले जाणार होते. परंतु दोन दिवस उलटूनही स्वाईन फ्लूचे नमुने तिथेच पडून आहेत. सोमवारी मेयोच्या प्रयोगशाळेत याची माहिती घेतली असता, मागील तीन दिवसांत एकही नमुना आला नसल्याचे येथील अधिकाऱ्याने सांगितले. यावरून हा प्रकार उघडकीस आला.