स्वाईन फ्लू दारात,मनपा कोमात !
By Admin | Updated: February 20, 2015 02:17 IST2015-02-20T02:17:55+5:302015-02-20T02:17:55+5:30
स्वाईन फ्लू मुळे राज्यात आजवर ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ३१ रुग्णांचा मृत्यू नागपुरात झाला आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपराजधानी हादरली आहे.

स्वाईन फ्लू दारात,मनपा कोमात !
नागपूर : स्वाईन फ्लू मुळे राज्यात आजवर ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ३१ रुग्णांचा मृत्यू नागपुरात झाला आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपराजधानी हादरली आहे. स्वाईन फ्लूने शहरात थैमान घातले असताना महापालिकेची आरोग्य यंत्रणा उपाय योजण्याऐवजी कोमात गेल्याचे चित्र आहे. स्वाईन फ्लूवर उपाय योजण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. महापालिकेच्या रुग्णालयात आलेल्या रुग्णाला मेयो-मेडिकलमध्ये रेफर करणे, आकडेवारी गोळा करून पाठविणे, फार फार तर माहिती पत्रके वाटणे एवढे काम करून महापालिका आपली जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांचे हाल : मेयो, मेडिकलवर भार
मनपाच्या आरोग्य विभागाचे तीन मोठे रुग्णालय व आवश्यक मनुष्यबळ असतानाही स्वाईन फ्लूच्या रुग्णांना भरती केले जात नाही. रुग्ण तपासणीची वेळही मर्यादित आहे. संशयित रुग्ण आढळून आल्यास थेट मेडिकलला रेफर आणि पॉझिटीव्ह रुग्णांच्या घरी जाऊन औषधांचे वितरण या पलिकडे विभागाला काम नाही. विशेष म्हणजे, संशयित रुग्णाचे नमुने घेण्याचे औचित्यही हा विभाग दाखवित नसल्याने आरोग्य विभागाची शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबतची अनास्था स्पष्टपणे दिसून येत आहे.
तपासणी केंद्र शोभेसाठी
स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाने दहा तपासणी केंद्र सुरू केले. हे केंद्र इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन रुग्णालय, डीक दवाखाना, शांतिनगर, बगडगंज, इतवारी, पाचपावली, बेझनबाग, सदर आणि महाल येथे आहेत. प्रत्येक केंद्रात एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची सोय आहे. केंद्राची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजताची आहे, परंतु दुपारी १ वाजता नंतर रुग्ण गेल्यास त्याला उपचाराविना परतावे लागते. विशेष म्हणजे, स्वाईन फ्लू संशयित रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संदर्भातील एक अर्ज भरून थेट मेडिकलकडे रेफर केले जाते. यामुळे हे तपासणी केंद्र शोभेचे बाहुले ठरत आहे.