स्वाईन फ्लूचा तरुणाईला विळखा
By Admin | Updated: March 8, 2015 02:36 IST2015-03-08T02:36:43+5:302015-03-08T02:36:43+5:30
देशात सर्वत्र स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत असून दिवसेंदिवस स्वाईन फ्लूने बळीं गेलेल्यांची संख्या वाढत चालली आहे.

स्वाईन फ्लूचा तरुणाईला विळखा
सुमेध वाघमारे नागपूर
देशात सर्वत्र स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत असून दिवसेंदिवस स्वाईन फ्लूने बळीं गेलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. हा आजार रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना लवकर होतो, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. परंतु आकडेवारी वेगळेच सांगत आहे. आतापर्यंत या आजाराला सर्वात जास्त युवा बळी पडले असून मृत्यूची संख्याही मोठी आहे. २० ते ४० या वयोगटात एकट्या मेडिकलमध्ये ५४ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूने २०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नागपूर विभागात सर्वाधिक म्हणजे ७३ रुग्णांचे बळी गेले आहेत. स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपराजधानी हादरली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल)रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाने (पीएसएम) उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार मेडिकलमध्ये १८ जानेवारीपासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येऊ लागले.
४ मार्चपर्यंत १४७ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये ६७ पुरुष असून ८० महिला तर मृतांमध्ये १२ पुरुष तर १८ महिला आहेत. यात युवा अवस्थेतील रुग्णांची संख्या मोठी आहे. तज्ज्ञाच्या मते, लहान मुले, गर्भवती आणि वृद्धांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी राहत असल्याने त्यांना स्वाईन फ्लू लवकर होण्याची शक्यता अधिक असते. या शिवाय उच्चरक्तदाब, मधुमेह, लठ्ठव्यक्ती व श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांसाठीही हा आजार धोकादायक ठरतो. परंतु गर्भवती महिला सोडल्यास इतर आजार सहसा युवकांमध्ये दिसून येत नाही. मात्र तरीही या वयोगटातील रुग्ण व त्याच्या मृत्यूची संख्या मोठी असल्याने तज्ज्ञामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
३० मृतांमध्ये १८ युवा
मेडिकलमध्ये शून्य ते १० वर्षे वयोगटातील २८ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून एकाचा मृत्यू आहे. १० ते २० वर्षे वयोगटातील ९ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून मृत्यू नाही. परंतु २० ते ३० वयोगटात २७ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ३० ते ४० या वयोगटात २७ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून सर्वाधिक १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४० ते ५० या वयोगटात १९ पॉझिटीव्ह व २ रुग्णांचा मृत्यू तर ५० ते ६० वर्षावरील वयोगटात ३७ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
२२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान सर्वाधिक रुग्ण
मेडिकलमध्ये १८ ते २५ जानेवारी या दरम्यान ९ रुग्ण, २६ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान १० रुग्ण, २ ते ८ फेब्रुवारीदरम्यान १७ रुग्ण, ९ ते १५ फेब्रुवारीदरम्यान २४ रुग्ण, १६ ते २१ फेब्रुवारीदरम्यान २१ रुग्ण, २२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान सर्वाधिक म्हणजे ४० रुग्ण तर १ ते चार मार्च दरम्यान २६ रुग्णांची नोंद झाली आहे.