महिलेशी अश्लील वर्तन करणारा स्विगी बॉय गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:46+5:302021-05-30T04:07:46+5:30
भर रस्त्यावर काढली होती छेड : पोलिसांनी शिताफीने केली अटक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रस्त्याने जात असलेल्या महिलेला ...

महिलेशी अश्लील वर्तन करणारा स्विगी बॉय गजाआड
भर रस्त्यावर काढली होती छेड : पोलिसांनी शिताफीने केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्याने जात असलेल्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून भररस्त्यावर तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी शिताफीने छडा लावला. सूरज सुधीर मालोदे (वय २७) असे त्याचे नाव असून, तो स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.
पीडित महिला २२ मेच्या दुपारी जरीपटक्यातून आपल्या घरी जात होती. आरोपीने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. महिलेने आरडाओरड केल्यामुळे तो पळून गेला. पीडित महिलेने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. भरदुपारी घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे पोलिसांनी आरोपीला हुडकून काढण्यासाठी परिसरातील सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी स्विगीची टी-शर्ट घालून दिसला. तो धागा पकडून पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितीन फटांगरे, निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ, उपनिरीक्षक नवनाथ देवकाते, कोंडीबा केजगीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्विगीच्या बेंगळुरूमधील मुख्यालयात संपर्क साधून नागपुरात काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयची माहिती मागविली. त्यातून २२ तारखेला दुपारी जरीपटका भागात कोणता कर्मचारी आला होता, त्याची माहिती काढली. त्याआधारे मालोदेच्या मुसक्या बांधल्या.
---
आरोपी अभियंता!
आरोपी हा अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. दोन आठवड्यापूर्वीच स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून तो कामाला लागला होता. एकटी महिला पाहून त्याची नियत फिरली आणि त्याने हे कुकृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीला हुडकून काढल्याबद्दल वरिष्ठांकडून तपास करणाऱ्या पोलिसांचे कौतुक होत आहे.
---