लोकशाहीच्या बळकटीसाठी ‘स्वराज अभियान’ विदर्भात
By Admin | Updated: June 29, 2015 03:09 IST2015-06-29T03:09:45+5:302015-06-29T03:09:45+5:30
दिल्लीत सत्ता मिळाल्यावर ‘आप’ची गाडी मूळ उद्देशापासून काहीशी भरकटल्यामुळे निराश झालेल्या कार्यकर्त्यांना एकत्र करून,...

लोकशाहीच्या बळकटीसाठी ‘स्वराज अभियान’ विदर्भात
योगेंद्र यादव साधणार संवाद : संघटनात्मक बांधणीवर भर
नागपूर : दिल्लीत सत्ता मिळाल्यावर ‘आप’ची गाडी मूळ उद्देशापासून काहीशी भरकटल्यामुळे निराश झालेल्या कार्यकर्त्यांना एकत्र करून, त्यांच्यात चेतना जागवून भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीचे ध्येय गाठण्यासाठी ज्येष्ठ निवडणूक अभ्यासक योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांच्यासह देशभरातील निवडक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. ‘स्वराज अभियान’ या बॅनरखाली पुन्हा एकदा नवी सुरुवात करण्यासाठी ही मंडळी मैदानात उतरली आहे. यासाठी विदर्भात संघटनात्मक बांधणी सुरू झाली आहे.
‘स्वराज अभियाना’च्या माध्यमातून योगेंद्र यादव व त्यांचे सहकारी विदर्भातील कार्यकर्ते, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या अभियानाबाबत माहिती देताना स्वराज अभियानच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य गिरीश नंदगावकर यांनी सांगितले की, २०११ मध्ये देशव्यापी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू झाले. बहुतांश लोक या आंदोलनातून समोर आले. प्रत्येक क्षेत्रात फोफावलेल्या भ्रष्टाचारावर लगाम लागावा, या विरोधात एक आंदोलन उभारले जावे, हा त्यामागील हेतू होता.
देशव्यापी आंदोलन झाले पण त्यानंतरही लोकपाल कायदा आला नाही. तेव्हा विचार समोर आला की हे ध्येय पूर्ण करण्यासाठी सत्तेत सहभागी होणे आवश्यक आहे.
कोणतेही काम करण्यासाठी चांगली माणसे हवी असतात. प्रत्यक्षात हा मार्ग स्वीकारला तेव्हा सत्तेपर्यंत पोहचण्यात काहीअंशी यश मिळाले.
आंदोलनातील हे चेहरे स्वच्छ प्रतिमेचे सरकार देऊ शकतात असे आशेचे किरण जनतेला दिसले व दिल्लीत भरभरून यश मिळाले. पण त्या यशप्राप्तीत कुठेतरी राजकारणाचा ‘शॉर्ट कट’ वापरला गेला. त्यामुळे, राजकारणातील एक वेगळा पर्याय देण्याचा, पारदर्शीपणा आणून खरे स्वराज आणण्याचा व जनतेच्या हाती देऊन भ्रष्टाचार संपविण्याचा केलेला दावा, कुठेतरी फोल ठरला.
लोकपाल आंदोलनातून तयार झालेली पार्टी ही आपल्या नेत्यावर चौकशी होऊ नये यासाठी पक्षांतर्गत लोकपालाला बरखास्त करते, ही बाब कुठेतरी मूळ ध्येयाच्या आड येणारी वाटली. तीन वर्षांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले.
लोकांमध्ये मागणी वाढली. पण आम्हीच दिलेली वचने पूर्ण करण्यात, त्यावर कायम राहण्यात कमी पडलो, असा विचार अंतर्मनात आला व यातूनच ‘स्वराज अभियाना’चा जन्म झाला, असे नंदगावकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
काय आहे ‘स्वराज अभियान’ ?
‘आप’मध्ये उठलेल्या वादळानंतर योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांच्यासह ४९ आमंत्रकांनी १४ एप्रिल २०१५ रोजी गुडगाव येथे स्वराज संवाद या बॅनरखाली देशभरातील कार्यकर्त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले. चार हजारावर कार्यकर्ते आले. त्यावेळी ‘स्वराज अभियान’ या नावाने एक संघटना स्थापन करावी. ती राजकीय आंदोलने करेल पण राजकीय पक्ष नसेल. प्रत्यक्ष निवडणूक लढण्यापूर्वी किंवा पक्ष स्थापन करण्यापूर्वी सर्व स्तरावर आंतरिक निवडणूक होत असलेली व पूर्णपणे पारदर्शीपणा असलेली संघटना चालवून दाखवायची, असा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. या पुढे जात ‘स्वराज अभियान’ची एक राष्ट्रीय सुकाणू समिती राहील. दररोजचे निर्णय घेण्यासाठी एक राष्ट्रीय कार्यकारिणी समिती राहील. पुढे या माध्यमातून राज्य, जिल्हा ते गाव पातळीपर्यंत संघटन वाढविले जाईल, असेही निश्चित करण्यात आले.
स्वराज अभियानची प्रत्येक शहर, जिल्हा, गाव, वॉर्डात संघटनात्मक रचना सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार सुरू आहे. कार्यकर्ते जोडले जात आहेत. लोकांचे प्रश्न लावून धरायचे व या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांनाही प्रशासकीय कामकाजाचे प्रशिक्षण द्यायचे. जेणेकरून जेव्हा केव्हा सत्ता आली तर त्या पदावर बसण्याची क्षमता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण असेल व ते खऱ्या अर्थाने सुशासन देऊ शकतील.
- प्रद्मुम्न सहस्रभोजनी
सदस्य, राष्ट्रीय सुकाणू समिती