संगणक परिचालकांच्या मोर्चाने फोडला घाम
By Admin | Updated: December 12, 2014 00:29 IST2014-12-12T00:29:04+5:302014-12-12T00:29:04+5:30
महाआॅनलाईन कंपनी ही ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकांचे आर्थिक व मानसिक शोषण करीत असल्याने ही कंपनी बंद करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्यभरातून तीन हजाराच्यावर युवा

संगणक परिचालकांच्या मोर्चाने फोडला घाम
तीन हजारांवर आंदोलनकर्ते : कठडे तोडले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन
नागपूर : महाआॅनलाईन कंपनी ही ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकांचे आर्थिक व मानसिक शोषण करीत असल्याने ही कंपनी बंद करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्यभरातून तीन हजाराच्यावर युवा संगणक परिचालकांनी आज गुरुवारी विधानभवनावर धडक दिली. टेकडी रोडवर हा मोर्चा अडविताच मोर्चेकऱ्यांनी कठडे तोडून रस्त्यावर उतरले. यामुळे दिवसभर तणावाचे वातावरण होते. ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनालाही मोर्चकरांनी दाद दिली नाही. लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही, या अटीवर रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते. संगणक परिचालक संघटनेच्या या मोर्चाने पोलिसांना चांगलाच घाम फोडला.
केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालय ‘ईपीआरआय’ हा प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. राज्य शासन व टाटा कन्सलटन्सी सर्व्हिस यांची अंगभूत संयुक्त कंपनी म्हणून महाआॅनलाईन कंपनीला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदस्तरावर डाटा एन्ट्री करण्याचे काम दिले आहे. यासाठी मदत घेण्यात येणाऱ्या संगणक परिचालकाला ठरवून दिल्याप्रमाणे आठ हजार रुपये मानधन देण्याचे आदेश आहेत. संघटनेचे सचिव सिद्धेश्वर मुंडे यांच्या मते, कंपनी हे मानधन न देता साडेतीन ते चार हजार रुपये मानधन देते. शासनाचे आदेश नसताना कंपनी महिन्याकाठी ४५० डाटा एंट्री करणे सक्तीचे करते. असे न केल्यास मानधन काढत नाही. याविरोधात राज्यभरातील संगणक परिचालक संघटनेने आंदोलन केले, मात्र ग्रामविकास मंत्रालयाने याची दखल न घेता उलट आॅपरेटर्सना नोकरीतून काढून टाकण्याचे आदेश दिले. परिणामी संतप्त झालेल्या तीन हजाराच्यावर संगणक परिचालकांनी आज विधानभवनावर धडक दिली. एवढ्या मोठ्या संख्येत आलेल्या मोर्चेकरांसमोर पोलिसांची संख्या तोकडी पडली. त्यांनी आल्याआल्या कठडे तोडून विधानभवनाकडे धावत सुटले, परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखत समोर कठडे लावून मोर्चेकरांना रोखले. मोर्चेकऱ्यांमध्ये वाढता असंतोष लक्षात घेऊन खुद्द ग्रामविकास राज्यमंत्री केसरकर मोर्चाला समोर गेले. येत्या आठ दिवसांत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, परंतु तोंडी नको लेखी आश्वासन द्या, या मोर्चेकरांच्या मागणीपुढे मंत्र्यांचे काहीच चालले नाही. शेवटी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत थंडीत हे आंदोलन सुरू होते.
नेतृत्व
विशाल चिखलीकर, बिट्टू रावेकर, सिद्धेश्वर मुंडे, कमलेश गमे, सोनु तितरमारे, पराग दांडेकर, प्रफुल्ल जाधव.
मागण्या
आर्थिक, मानसिक शोषण करणारी महाआॅनलाईन कंपनी बंद करा.
संगणक परिचालकांना जिल्हा परिषदमार्फत शासन सेवेत समाविष्ट करा.
महाआॅनलाईन कंपनीची चौकशी करा.