६५ वर्षानंतरही सुजाण मतदार तयार झाला नाही

By Admin | Updated: November 27, 2015 03:22 IST2015-11-27T03:22:41+5:302015-11-27T03:22:41+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली. घटनेत प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळवून दिला.

Suzan voters are not ready even after 65 years | ६५ वर्षानंतरही सुजाण मतदार तयार झाला नाही

६५ वर्षानंतरही सुजाण मतदार तयार झाला नाही

रामराजे निंबाळकर : कलावंतांचा सत्कार सोहळा
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली. घटनेत प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळवून दिला. पण बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला सुजाण मतदार घटनेचा स्वीकार केल्यानंतर ६५ वर्षात तयार झाला नाही, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संविधान दिनाच्या निमित्ताने व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ कलावंतांचा सत्कार सोहळा गुरुवारी वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून रामराजे निंबाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार दीनानाथ पडोळे आदी उपस्थित होते. प्रसंगी बोलताना निंबाळकर म्हणाले की, बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेमुळे या देशात विविध जाती, धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत.
बाबासाहेबांच्या घटनेत गरिबाबद्दल दया, कणव, सहानुभूती दाखविली आहे. बाबासाहेबांनी तयार केलेली घटना कोण्या एका समाजासाठी नाही, तर या देशात जन्मलेल्या प्रत्येकासाठी आहे. त्यामुळे बाबासाहेबांना कुण्या एका धर्मासाठी मर्यादित ठेवू नका.
बाबासाहेबांनी लोकशाहीची मूल्ये डोळ्यासमोर ठेवून, प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला. परंतु त्यांना अपेक्षित असलेला सुजाण मतदार, समाजाभिमुख राजकारणी तयार झाला नाही. याप्रसंगी सुनील तटकरे म्हणाले की, बाबासाहेबांना अपेक्षित असलेली सामाजिक न्यायाची संकल्पना शरद पवारांनी महाराष्ट्रात मांडली. शरद पवारांमुळेच सामाजिक न्याय विभागासाठी सरकारच्या बजेटमध्ये मोठी तरतूद झाली.
यावेळी सुरमणी पंडित प्रभाकरराव धाकडे गुरुजी, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, संदेश विठ्ठल उमप, प्रकाश पाटणकर, आनंद शिंदे यांच्यासह ७५ कलावंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश गजभिये यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Suzan voters are not ready even after 65 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.