वैद्यकीय निष्काळजीमुळे सुयशच्या मंडलिक दाम्पत्याला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST2021-01-08T04:21:24+5:302021-01-08T04:21:24+5:30
नागपूर : वैद्यकीय निष्काळजीपणा केल्यामुळे अभ्यंकरनगर येथील सुयश नर्सिंग होमच्या मुख्य व्यवस्थापक डॉ. रागिणी मंडलिक व त्यांचे पती डॉ. ...

वैद्यकीय निष्काळजीमुळे सुयशच्या मंडलिक दाम्पत्याला दणका
नागपूर : वैद्यकीय निष्काळजीपणा केल्यामुळे अभ्यंकरनगर येथील सुयश नर्सिंग होमच्या मुख्य व्यवस्थापक डॉ. रागिणी मंडलिक व त्यांचे पती डॉ. मिलिंद मंडलिक यांनी तक्रारकर्ते दाम्पत्य उमेश व शीतल पानबुडे यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १२ लाख व तक्रार खर्चापोटी ३० हजार रुपये भरपाई अदा करावी असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले. मंडलिक दाम्पत्याला या आदेशांचे पालन करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला. तसेच, या मुदतीत आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास रोज ३०० रुपये अतिरिक्त भरपाई लागू होईल असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.
आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला. तक्रारकर्त्या शीतल पानबुडे यांनी बाळंतपणाचे उपचार मंडलिक दाम्पत्याकडे केले. वेळोवेळी आवश्यक तपासण्या केल्या गेल्यानंतर १४ जानेवारी २०११ रोजी शीतल यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. १८ जानेवारी रोजी त्यांना सुटी देण्यात आली. प्रसूतीपूर्वी तक्रारकर्त्यांना बाळ सामान्य असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात बाळाला विविध शारीरिक व्याधी होत्या. त्याची माहिती आधीच दिली गेली असती तर, बाळाला जन्म द्यायचा किंवा नाही याचा योग्यवेळी निर्णय घेता आला असता. आता जन्मलेल्या बाळाला आयुष्यभर व्याधी सोसाव्या लागतील. त्याचा त्याला मानसिक व शारीरिक त्रास होईल. त्यामुळे कुटुंबीयांनाही यातना होतील असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे होते. तक्रारकर्त्यांनी यासंदर्भात मंडलिक दाम्पत्याला पत्र लिहून आवश्यक भरपाई देण्याची मागणी केली होती. परंतु, मंडलिक दाम्पत्याने स्वत:ची चूक अमान्य करून भरपाई देण्यास नकार दिला. परिणामी, तक्रारकर्त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. आयोगाने तक्रारीवरील अंतिम सुनावणीनंतर मंडलिक दाम्पत्याचे उत्तर व रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता हा निर्णय दिला. मंडलिक दाम्पत्याने वैद्यकीय सेवेमध्ये निष्काळजीपणा केला असे आयोगाने जाहीर केले.