कचरा वेचणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: May 22, 2016 02:44 IST2016-05-22T02:44:59+5:302016-05-22T02:44:59+5:30
सदरमधील व्यापाऱ्याने कचरा वेचणाऱ्या एका गरीब इसमाला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याच्या चर्चेने मोहननगरातील चौरसिया चौकाजवळ

कचरा वेचणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
मोहननगरातील घटना :
हत्येची चर्चा;पोलिसांचा इन्कार
नागपूर : सदरमधील व्यापाऱ्याने कचरा वेचणाऱ्या एका गरीब इसमाला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याच्या चर्चेने मोहननगरातील चौरसिया चौकाजवळ शनिवारी सकाळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनीही हा हत्येचाच प्रकार असल्याचे दुपारी सांगितले होते. मात्र, डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानंतर पोलिसांनी ती हत्या नव्हे तर आकस्मिक मृत्यूचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. मृताचे नाव भावेश ऊर्फ नरेश असून, तो कुठला आहे ते रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नाही.
मृत भावेश पन्नी, प्लास्टिक असा कचरा वेचून पोट भरत होता आणि रेल्वे स्थानकाजवळच्या फुटपाथवर झोपत होता. शुक्रवारी दुपारी ११ ते १२ च्या सुमारास तो पांडू चौरसियाच्या दुकानाजवळ कचरा गोळा करीत होता. उन्हामुळे धाप लागल्याने तो दुकानाच्या शेजारी सावलीत बसला. पांडूने त्याला तेथून शिवीगाळ करून हाकलण्याचा प्रयत्न केला. भावेशने शिवीगाळ करू नका, थोड्या वेळाने जातो, असे सांगितले. त्यामुळे पांडूने त्याला तेथून हाकलण्यासाठी मारहाण केली. भावेशची केविलवाणी आरडाओरड ऐकून बाजूचा दुकानदार धावत आला. त्याने पांडूच्या तावडीतून भावेशला सोडवले आणि बाजूला नेऊन बसवले. त्यानंतर मदत करणारा निघून गेला. आज सकाळी व्यापारी दुकान उघडण्यासाठी आले असता त्याला भावेश ज्या ठिकाणी बसला होता त्या गोविंद भवनजवळ तसाच बसून दिसला. त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहत होते. तो मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर आजूबाजूची मंडळी मोठ्या संख्येत गोळा झाली. पांडूने मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होऊ लागल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच सदरचे ठाणेदार मनोज सिडाम पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह मेयोत नेला. पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनीही धाव घेऊन संतप्त जमावाला शांत केले. घटनाक्रम माहिती पडल्यानंतर मारहाण करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले.(प्रतिनिधी)
प्रकरणाला कलाटणी
बेदम मारहाणीमुळे अंतर्गत दुखापत झाली आणि त्यामुळेच भावेशचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज मेयोतील डॉक्टरांनी व्यक्त केला. मात्र, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट करताना दारूमुळे भावेशचे फुफ्फुस सडले होते. मारहाण झाल्यानंतर अशक्तपणामुळे तो तसाच पडून राहिला. उन्हाचा तडाखा आणि कोणतेही उपचार मिळाले नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे पोलीस म्हणतात. त्यामुळे ताब्यात घेतलेल्याला पोलिसांनी सायंकाळी सोडून दिले.