पुरस्कार परत करणाऱ्यांच्या हेतूबद्दल संशय
By Admin | Updated: November 21, 2015 03:28 IST2015-11-21T03:28:36+5:302015-11-21T03:28:36+5:30
पुरस्कार परत करून सरकारचा निषेध करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून आपण अनुभवत आहोत.

पुरस्कार परत करणाऱ्यांच्या हेतूबद्दल संशय
सदानंद मोरे : स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार प्रदान
नागपूर : पुरस्कार परत करून सरकारचा निषेध करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून आपण अनुभवत आहोत. १९९८ मध्ये मला दिलेला साहित्य अकादमीचा पुरस्कार २०१५ च्या सरकारच्या निषेधात मी का परत करावा, हे मला तार्किक वाटत नाही. निषेध करण्याचे अनेक प्रकार आहेत. परंतु पुरस्कार परत करणे म्हणजे पुरस्कार देणाऱ्यांच्या भावनेचा अनादर करणे होय. त्यामुळे सरकारच्या निषेधात पुरस्कार परत करणाऱ्यांच्या हेतूबद्दल मला संशय येतोय, असे मत प्रसिद्ध लेखक, समीक्षक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
मारवाडी फाऊंडेशनतर्फे डॉ. सदानंद मोरे यांना शुक्रवारी स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मारवाडी फाऊंडेशनचे अध्यक्ष खा. अजय संचेती, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विचारवंत व ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत भाऊ तोरसेकर यांच्याहस्ते डॉ. मोरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराच्या स्वरूपात शाल, श्रीफळ, एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी मारवाडी फाऊंडेशनचे गिरीश गांधी, सत्यनारायण नुवाल, पूनमचंद मालू, नंदकिशोर सारडा, विजय मुरारका, डी.आर. मल आदी उपस्थित होते. यावेळी मोरे यांनी मारवाडी समाजाचा राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्यात, समाज सुधारणेत व मराठी साहित्यातील योगदानाबद्दलचे काही दाखले दिले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना ते म्हणाले की, परखडपणा, रोखठोकपणा त्यांच्या स्वभावात होता. जोपर्यंत समाज आहे, तोपर्यंत प्रबोधनकारांचे कार्य राहील, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी भाऊ तोरसेकर यांनीही पुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेचा तिखट समाचार घेतला. ते म्हणाले की, पुरस्कार हे कोणी दिलेले बक्षीस नसते. पुरस्कारामागे आपल्या कार्याची पाठ थोपटणे हा उद्देश असतो. पुरस्कार परत करणाऱ्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी पुरस्कार देणाऱ्यांचा अपमान केला आहे. ज्यांनी पुरस्कार परत केला, त्यांना पुरस्काराचा अर्थच कळला नाही. यावेळी उल्हासदादा पवार म्हणाले की, जातीपातीच्या पलीकडे जाऊन प्रबोधनकारांनी समाजाच्या विकासासाठी काम केले आहे.
आज समाजात वंशवाद, जातीवाद वाढला आहे. प्रत्येकजण परिवर्तन हा शब्द वापरतो आहे. परंतु परिवर्तनातच वर्तन हा शब्द आहे. वैयक्तिक सद्वर्तन व सामाजिक भान ठेवल्यास परिवर्तन घडू शकते. हेच कार्य डॉ. मोरे करीत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात गिरीश गांधी म्हणाले मारवाडी फाऊंडेशन माणसामाणसाला जोडण्यासाठी जातीच्या बाहेर जाऊन काम करीत आहे.
पुरस्कार देणे हा राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून केलेला छोटासा प्रयत्न आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले. (प्रतिनिधी)
बुद्धिवादी म्हणविणारे सुधारक पोकळ आहेत
आजचे बुद्धीवंत जे स्वत:ला सुधारक समजतात, ते इतिहासाच्या सगळ्या सुधारकांना धोंडे मारतात आणि तेच पुढे महात्मा म्हणून मिरवितात. सुधारक हा समाजासाठी असतो, तो स्वत:चा विचार करीत नाही. बुद्धीवादी म्हणविणारे सर्व सुधारक पोकळ आहेत, असे मत भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले. आज समाजात सुधारक, प्रबोधनकार राहिले नसल्याने साधु, संत, स्वामी बोकाळले आहे. प्रबोधनकार हे दुखण्यावर बोट ठेवत होते. त्यामुळे आजच्या प्रस्थापित बुद्धीवादींमध्ये त्यांना स्थान मिळत नाही.