होमगार्डचे सूडबुद्धीने निलंबन !
By Admin | Updated: July 10, 2015 02:37 IST2015-07-10T02:37:35+5:302015-07-10T02:37:35+5:30
पोलीस भरतीसाठी अनुभव प्रमाणपत्र न देता उलट सूडबुद्धीने निलंबन कारवाई केल्याच्या आरोपासह एका होमगार्ड ...

होमगार्डचे सूडबुद्धीने निलंबन !
जिल्हा समादेशकाचा प्रताप : पोलीस आयुक्तांकडे तक्रार
नागपूर : पोलीस भरतीसाठी अनुभव प्रमाणपत्र न देता उलट सूडबुद्धीने निलंबन कारवाई केल्याच्या आरोपासह एका होमगार्ड सैनिकाने पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. ज्ञानेश्वर गजानन गोखे असे त्या होमगार्डचे नाव आहे. गोखे यांच्या मते, गत २००८ पासून ते होमगार्ड विभागात कार्यरत होते. दरम्यान २०१४ मध्ये त्यांना पोलीस भरतीची माहिती मिळाली. त्यात आरक्षण प्राप्त करण्यासाठी गोखे यांनी होमगार्डचे जिल्हा समादेशक अनिल आदमने यांच्याकडे तीन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्रासाठी मागणी केली. परंतु त्यासाठी आदमने यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा गोखे यांनी आरोप केला आहे. गोखे यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने त्यांनी पाच हजार रुपयांची लाच देण्यास असमर्थता दर्शविली. त्यावर आदमने यांनी गोखे यांची परेड व कर्तव्य कमी असल्याचे कारण पुढे करू न त्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. शिवाय त्यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने निलंबनाची कारवाई करू न त्यांना सेवेतून कमी केले. या घटनाक्रमानंतर रोजगार संघाचे अध्यक्ष संजय नाथे यांनी माहितीच्या अधिकारात होमगार्ड विभागाकडून मागितलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक माहिती पुढे आली. गोखे यांनी १२२ कवायतीपैकी केवळ २५ कवायती केल्याचे सांगून त्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. परंतु माहितीच्या अधिकारात गोखे ५२ कवायतींना हजर असल्याचे स्वत: होमगार्ड विभागाने सांगितले. यावरू न आदमने यांनी केवळ लाच न मिळाल्यामुळे गोखे यांना प्रमाणपत्र दिले नसल्याचे दिसून येते. याशिवाय जिल्हा समादेशक आदमने यांनी नवीन होमगार्डची भरती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचाही पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत गोखे यांनी उल्लेख केला आहे. यात आदमने यांच्यासह तालुका समादेशक मासूरकर सुद्धा सहभागी असल्याचे सांगितले आहे. तरी आपल्या विरूद्ध करण्यात आलेली निलंबन कारवाई मागे घेऊन पोलीस भरतीत सहभागी होण्यासाठी तीन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी होमगार्ड गोखे यांनी पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे. (प्रतिनिधी)
सोनेगावात जखमी इसमाचा मृत्यू
नागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ जूनला सकाळी ८ वाजता आरोपी सतीश गोपाळराव महाकाळकर (वय ३७, रा. खापरी) याने एका इसमाला जबर धडक मारली होती. गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. (प्रतिनिधी)
सोनेगाव पोलिसांनी आरोपी सतीशविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे.